‘इंदू मिलचे स्मारक म्हणजे चुनावी जुमला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:18 AM2017-12-07T02:18:29+5:302017-12-07T02:18:34+5:30
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कसलीच निविदा निघाली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट घालण्यात आला.
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कसलीच निविदा निघाली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट घालण्यात आला. केवळ बिहारच्या निवडणुकांसाठीची ती राजकीय खेळी होती. आता गुजरात निवडणुका असल्यामुळे एक महिन्यात स्मारकाचे काम सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपासाठी हे स्मारक चुनावी जुमला बनला असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी केली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर इंदू मिल येथे जाऊन बुद्धवंदना केली. या वेळी निरुपम म्हणाले की, बिहारच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या
हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दोन वर्षे झाली तरी स्मारकाची एक वीटही रचली गेली नाही. कसलीही निविदा निघालेली नसताना आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे भूमिपूजन करण्यात आले होते, असा आरोप निरुपम यांनी केला.
दोन वर्षांनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेची राजकीय दिशाभूल चालविली आहे. एका महिन्यात स्मारकाचे काम सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ही घोषणादेखील भाजपाच्या चुनावी जुमल्याचा भाग आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. राजकीय फायद्यासाठी भाजपा खालच्या थराचे राजकारण करत असल्याची टीकाही निरुपम यांनी केली.