मुंबई - सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, सोशल मीडियावरही इंदुरीकर महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटीझन्सने इंदुरीकरांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर, इंदुरीकर महाराजांनी स्वत: स्टेजवरील भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. मी केवळ पूरग्रस्तांच्या मदतीचा धनादेश देण्यासाठी गेल्याचे महाराजांनी सांगितले होते.
इंदुरीकर महाराजांची ही भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली. तसेच, अनेकांनी लवकरच महाराज भाजपात प्रवेश करतील, तर काहींनी चक्क बाळासाहेब थोरातांविरुद्ध निवडणूक लढवतील, अशाही अफवा पसरवल्या. मात्र, या भेटीबद्दल स्वत: इंदुरीकर महाराजांनी खुलासा केला आहे. महाराजांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचा मला पाठिंबा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच, समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून इंदुरीकर महाराजांचं नावलौकिक आहे. त्यामुळे, महाराजांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे, त्याबाबत मी बोलणार नाही, असेही थोरात यांनी म्हटले.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा एकदा एका किर्तनात संगमनेर येथील भेटीचा उलगडा केला. मी केवळ पूरग्रस्तांना निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं महाराजांनी स्पष्ट केलं. तसेच, केवळ तीन मिनिटांच्या भेटीचा मीडियानी राज्यभर बोंग्या केला, असंही महाराजांनी आपल्या खास शैलीत म्हटलं. आपल्या भेटीला माध्यमांनीच चुकीचं वळण लावल्याचा आरोप महाराजांनी विनोदी शैलीत केला.