Join us

Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांचा 'हा' व्हिडिओ बघाच; मनसेचा तृप्ती देसाईंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 8:35 AM

Indurikar Maharaj: इंदोरीकरांच्या विधानावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती. दोन दिवसांपूर्वी या नोटिशीला इंदोरीकर महाराजांनी उत्तर दिलं होतं. 

ठळक मुद्देइंदोरीकरांच्या विधानावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होतीमी तसे बोललोच नाही, इंदोरीकर महाराजांनी दिलं नोटिशीला उत्तर या जगातील सर्वात मोठं पाप म्हणजे स्त्री भ्रूण हत्या - इंदोरीकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही पेटलं होतं. इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत काहींनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अनेक संघटना पुढे सरसावल्या होत्या. 

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या आग्रही मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अहमदनगरमध्ये जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं होतं. इंदोरीकर महाराज नेहमी कीर्तनातून महिलांचा अपमान करतात असा आरोप त्यांनी केला होता. त्याचसोबत ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला होता. मात्र तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यावरुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांना प्रतिइशारा दिला होता. 

आता इंदोरीकर महाराजांचा महिलांवरील जुना व्हिडिओ व्हायरल करुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तृप्ती देसाईंवर पुन्हा निशाणा साधला आहे. या व्हिडिओत इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं. या व्हिडिओत महाराज म्हणतात की, १ हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. काही महिला मुलगी झाल्यावर तोंड पाडतात पण का? तुम्ही पण मुलगी होता ना, तुमच्या बापाने जमिनी विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना, मग मुलगी व्हायलाच पाहिजे. लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतकऱ्याने जोडधंदा करा, पण मुलगी शिकवा, मुलींसाठी अनेक योजना सरकार देतं त्याचा फायदा घ्या असं महाराज सांगताना दिसतात. 

इंदोरीकरांच्या विधानावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती. दोन दिवसांपूर्वी या नोटिशीला इंदोरीकर महाराजांनी उत्तर दिलं होतं. यामध्ये ते म्हणतात की, मी तसे बोललोच नाही. ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही असं त्यांनी सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र एका मुंबई येथील वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. त्यांना कोठून पुरावे मिळाले याची विचारणा केलेली आहे. त्यांचे अद्याप उत्तर आले नाही. त्यामुळे कारवाई लगेच शक्य नाही असं अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केलं होतं.  

टॅग्स :इंदुरीकर महाराजमनसे