Join us

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ओसाड

By admin | Published: July 24, 2015 2:52 AM

बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलांना योग्य शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळावी, यासाठी मानखुर्द परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती

समीर कर्णुक, मुंबईबालसुधारगृहात राहणाऱ्या मुलांना योग्य शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळावी, यासाठी मानखुर्द परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे औद्योगिक केंद्र ओसाड पडले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी बालगुन्हेगारांना बालसुधारगृहात सोडल्यानंतर या मुलांना कपडे, राहण्याची सोय, जेवण आणि शिक्षण या सुविधा सुधारगृहात पुरवल्या जातात. पोलिसांमार्फत आलेले बालगुन्हेगार आणि छाप्यामध्ये पकडलेल्या मुलांना काही कालावधीनंतर त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जातात. मात्र अनाथ मुलांना कोणाचा आधार नसल्याने वयाच्या १८ वर्षांपर्यंत त्यांना बालसुधारगृहातच ठेवले जाते. या मुलांच्या शिक्षणानंतर त्यांना चांगली नोकरी मिळावी, यासाठी दी चिल्ड्रन सोसायटीमार्फत मानखुर्दच्या आगरवाडी परिसरात १९८९ ला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. येथील १० एकर जागेवरील इमारतींमध्ये प्रशिक्षण वर्ग उभारण्यात आले. बालसुधारगृहात राहणाऱ्या सर्वच मुलांना हे शिक्षण सक्तीचे करण्यात आले होते. यात फिटर, वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या कोर्सचा समावेश होता. तसेच या ठिकाणी शिकलेल्या मुलांना रेल्वे अथवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये तत्काळ नोकरी मिळत असल्याने बाहेरील विद्यार्थीही या ठिकाणी शिक्षणासाठी येत होते. बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी अल्प दरात हे कोर्सेस होते. शिवाय राहण्याचीही सोय असल्याने संपूर्ण राज्यातून गरीब मुले या ठिकाणी शिक्षण घेत होती. मात्र, २०११ मध्ये अचानक बालसुधारगृहातील या सर्व मुलांचे आयटीआयचे शिक्षण बंद करण्यात आले तसेच शिक्षकांना केंद्र बंद का केले, याची कल्पनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही हे चार कर्मचारी रोज नेहमीप्रमाणे सकाळी कामावर येऊन सायंकाळी घरी निघून जातात. सायन-पनवेल मार्गाला लागून अगदी मोक्याच्या ठिकाणी हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र होते. मात्र चार वर्षांपासून ते बंद असल्याने इमारतींभोवती मोठ्या प्रमाणात गवत आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र सध्या हे प्रशिक्षण केंद्र ओसाड असल्याचा फायदा घेत गेल्या काही वर्षांत येथील सामानाची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे.