उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:31 AM2024-10-10T05:31:23+5:302024-10-10T05:31:23+5:30
आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श निर्माण करणारे... कोट्यवधी मनांवर आपल्या प्रेरणादायी आचार अन् विचारांचा वस्तुपाठ कोरणारे प्रसिद्ध उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सुरुवातीला रक्तदाबाचा त्रास होता. मात्र त्यानंतर त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये कोणत्याही विशेष आजराचे निदान झाले नव्हते. मात्र त्यानंतर काही कालावधीने त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. रुग्णलायतील वरिष्ठ डॉक्टरच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर बुधवारी रात्री ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रतन टाटा :
दोन दशके अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. जेआरडी टाटा यांच्याकडून जेव्हा रतन टाटा यांनी व्यवसायाची सुत्रे स्वीकारली त्यानंंतर विश्वास या शब्दाशी एकरुप झालेला त्यांचा व्यवसाय पुढे तसाच जोपासणे आणि प्रत्येक दशकात भारतात होणाऱ्या नव्या घडामोडींचा वेध घेत त्या अनुषंगाने व्यवसाय विस्तार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. एका कुटुंबाचा उद्योग या प्रतिमेतून जागतिक दर्जाचे व्यवसाय साम्राज्य अशी त्यांनी टाटा समुहाची ओळख निर्माण केली. मूल्याधारित व्यवसाय हे सूत्र त्यांनी तंतोतंत जोपासले. संयत व नम्र व्यावसायिक ही त्यांची छबी कायमच जनमानसाच्या मनावर कोरली गेली आहे.
याेग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेताे आणि ताे याेग्य ठरवताे. जग हे असंख्य कल्पनांनी खच्चून भरलेले आहे. पण त्या कल्पना प्रत्यक्षात आणून यश मिळवण्यासाठी कृतीची गरज असते. - रतन टाटा