मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार-उद्योगमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 06:26 AM2020-08-05T06:26:17+5:302020-08-05T06:27:58+5:30
विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे मुंबई महानगर व इतर महापालिका क्षेत्रांतील अत्यावश्यक सेवांसह इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय लवकरच घेईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितले. उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्यप्रणालीचे पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी उद्योजक संघटकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या वेबिनारमध्ये स्पष्ट केले.
विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगविश्व पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत, ही बाब उद्योगक्षेत्रासाठी दिलासादायक आहे. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे देसाई म्हणाले. नागपूर, औरंगाबाद व इतर ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. त्या सोडविण्याची ग्वाही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांनी दिली. या वेळी उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.