Join us

जिल्ह्यातील उद्योग २७ ला बंद

By admin | Published: February 20, 2015 12:03 AM

वीज दरवाढीचा निषेध : ‘गोशिमा’, कागल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा निर्णय

शिरोली : वीज दरवाढीच्या निषेधार्थ २७ फेब्रुवारीला गोकुळ शिरगाव व कागल येथील उद्योग एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गोशिमा आणि मॅक या दोन्ही औद्योगिक संघटनांनी गुरुवारी घेतला आहे.राज्यातील विजेचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच सन २०१४ मधील नोव्हेंबर आणि डिसेंबर व जानेवारी २०१५ मधील वीज बिलाचे अनुदान उद्योगांना अद्याप मिळालेले नाही. महावितरणने वीज दरात केलेल्या भरमसाठ वीज दरवाढीमुळे उद्योग मेटाकुटीस आले. शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगड या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर जादा आहे. त्यामुळे येथील उद्योगांना तोट्यात जाऊन काम करावे लागत आहेत.ही वीज दरवाढ कमी करण्यासाठी औद्योगिक संघटनांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले; पण त्याचा कोणताच फायदा झाला नाही. अखेर उद्योजकांनी २७ फेब्रुवारीला विज बिलांची राज्यभर एकाचवेळी होळी करण्याचे ठरवले आहे. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिशन (गोशिमा) आणि कागल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मॅक) या दोन्ही औद्योगिक संघटनांनी गुरुवारी बैठक घेऊन २७ फेब्रुवारीला उद्योग बंद ठेवून महावितरणवर मोर्चा काढून वीज बिलांची होळी करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर साखळीउपोषण करणार आहेत, असे गोशिमा व मॅक येथील उद्योजकांच्या बैठकीत ठरले आहे. यावेळी गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, आय. आय.एफ.चे अध्यक्ष विलास जाधव, संजय उरमनट्टी, संजय जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, गोरख माळी, अशोक दुधाणे, आदींसह गोशिमा व मॅकचे संचालक, उपस्थित होते.महावितरण कंपनीने जे विजेचे दर वाढवून ठेवले आहेत ते उद्योजकांना न परवडणारे आहेत. यामुळे उद्योजकांना उद्योग चालविणे अवघड झाले आहे. उद्योग चालायचे असतील, तर वीज दर कमी केले पाहिजेत, अन्यथा उद्योग बंद पडतील.- मोहन कुशिरे, अध्यक्ष मॅक, कागलगेल्या दोन महिन्यांत उद्योगांना ४० टक्के वीज दरवाढ केली आहे. ही दरवाढ इतर राज्यांच्या तुलनेत फार जास्त आहे. त्याचा परिणाम उत्पादनावरही होतो आणि आॅर्डरी इतर राज्यात जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच २७ फेब्रुवारीला उद्योग बंद ठेवणार आहे. - अजित आजरी, अध्यक्ष गोशिमा.राज्यकर्त्यांची फक्त आश्वासनेचपुन्हा वीजदर वाढ केल्याने फौंड्री उद्योग चालूच शकत नाही. म्हणून सर्व उद्योग बंद ठेवून उद्योजक, कामगार यांना घेऊन मोर्चा काढणार आणि निषेध व्यक्त करणार आहे. कारण उद्योजकांपुढे आता कोणताच पर्याय राहिलेला नाही. म्हणून हा मोर्चा काढणार आहे. राज्यकर्त्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत. वीजदरवाढ रद्द केली नाही तर पुन्हा वाढवली आहे. म्हणूनच हा २७ फेब्रुवारीचा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.