मुंबईत पाणीवाटपात विषमता, पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:31 AM2020-03-22T01:31:28+5:302020-03-22T01:31:38+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक माणसाला आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

 Inequality in water sharing in Mumbai, everyone has the right to get water | मुंबईत पाणीवाटपात विषमता, पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार

मुंबईत पाणीवाटपात विषमता, पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार

Next

मुंबई : ‘आपण सारे मुंबईकर’ या भावनेने मुंबईत राहत असलो, तरी गरीब-श्रीमंतीचा भेद पाण्याच्या वितरणात स्पष्टपणे जाणवतो, अशी टीका पाणी हक्क समितीने केली आहे. ‘जागतिक जल दिना’च्या निमित्ताने समितीने मुंबई महापालिकेच्या जल कारभारावर आसूड ओढले असून, श्रीमंतांच्या वस्त्यांप्रमाणेच झोपडीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात आजही ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे डायरिया, कॉलरा, काविळीसारखे साथीचे आजार पसरतात. पावसाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांमध्ये त्वचेचे विकार, खरूज यांसारखे आजार आढळतात. दुसरीकडे अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी रांग लावणे, पाणी भरणे यांसारखी जबाबदारी लहान मुले पार पाडतात. याचा विपरित परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी येण्याची वेळ रात्री-अपरात्री असल्याने पुरेशी झोप मिळत नाही. त्यातून मानसिक आजार बळवितात. उदा. पाणी आल्याचा भास होऊन रात्री-अपरात्री दचकून जाग येते. कमी झोपेमुळे हृदयविकाराचा धोका संभावतो. पाण्याच्या कमतरतेमुळे वाटपावेळी संघर्ष निर्माण होतात. शारीरिक दुखापती होतात. अनेक गरीब वस्त्यांमध्ये जलजोडणी घेतल्यानंतर दोन-चार महिने पाणी व्यवस्थित येते. मात्र, कालांतराने पाण्याचा दाब कमी होतो आणि त्यानंतर पाणीच येत नाही. तरीही पाण्याचे बिल मात्र मोठे येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक माणसाला आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. पिण्यासाठी आणि जेवणासाठी कमीतकमी २० लीटर शुद्ध आणि सुरक्षित पाणी प्रत्येक माणसाला मिळणे गरजेचे आहे. त्यात जीवजंतू, घातक रसायने आणि किरणोत्सर्गाचा समावेश नसावा. पिण्यासह घरगुती वापरासाठीच्या पाण्याचा रंग, चव, गंध हा पाणी पित असलेल्याला स्वीकारार्ह असावा. पाणी वितरणात भेदभाव नसावा. कामाच्या ठिकाणी, संस्थांमध्ये सुरक्षित आणि स्वीकारार्ह पाणी सहज सुलभ मिळावे, पण प्रत्यक्षात महानगरी मुंबईत विदारक स्थिती आहे.

पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लीटर
मुंबई शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटी ३० लाख आहे. मुंबईची पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लीटर आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीगळती, बेकायदा नळजोडणी, पाणीचोरी, पाणी वापराच्या मीटरमधील तफावत इत्यादी कारणांमुळे मुंबईला पुरवठा होत असलेल्या अंदाजे २५ टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही.

गळतीचे प्रमाण
२५ ते ४० टक्के
मुंबई महापालिकेची पाणीपुरवठा करणारी
यंत्रणा १८४५ सालापासून अस्तित्वात आली. १८६० साली मिठी नदीवर विहार धरणाचे
काम सुरू झाले.
मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेमधील गळतीचे प्रमाण २५ ते ४० टक्के आहे. ८६२ ते १,३०० दशलक्ष लीटर पाणी गळतीमुळे वाया जाते. पाणीपुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार शहरात राहणाºया प्रत्येक व्यक्तीला १५० लीटर पाण्याची गरज आहे. आज मुंबईतील झोपड्यांमध्ये दर माणसी दररोज ४० लीटरपेक्षाही कमी पाणी पिण्यासह घरगुती वापरासाठी मिळते. प्रत्यक्षात मात्र प्रति दिन प्रति व्यक्ती १३० लीटर पाणी पुरविण्याचे पालिकेचे धोरण आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव
तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा, मध्य वैतरणा

Web Title:  Inequality in water sharing in Mumbai, everyone has the right to get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई