कुख्यात गुंडाला समतानगरमध्ये अटक
By admin | Published: April 1, 2017 04:11 AM2017-04-01T04:11:07+5:302017-04-01T04:11:07+5:30
दारूसाठी पैसे नाकारले म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी समतानगर
मुंबई : दारूसाठी पैसे नाकारले म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी समतानगर पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला अटक केली आहे. या गुंडावर १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
संदीप यादव उर्फ मुसई (२६) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग, दरोडा, मारहाण, चोरी, जीवे मारण्याची धमकी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सध्या तो दरोड्याप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिमलेश बिंड या तरुणाकडून संदीपने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र बिंडने ते देण्यास नकार दिला. तेव्हा संदीपने आचल बारसमोर असलेल्या दुभाजकावर त्याचे डोके आपटून त्याला जखमी केले. तसेच एक दगड त्याच्या डोक्यात उचलून घालणार तितक्यात बिंडच्या आईने संदीपला अडवले. स्थानिकांची गर्दी पाहून तो घटनास्थळाहून फरार झाला. मात्र बिंडच्या आईने या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर समतानगर परिसरातूनच त्याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)