राज्यात गर्दीबरोबर संसर्गही वाढतोय, पुणे, सोलापुरातही चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:55 AM2020-06-11T08:55:54+5:302020-06-11T08:56:16+5:30
दिवसभरात ३,३५४ रुग्ण; पुणे, सोलापुरातही चिंता
मुंबई : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वाढणाऱ्या गर्दीबरोबरच कोरोनाचा संसर्गही वाढत असल्याच्या दुहेरी चिंतेने प्रशासनाच्या छातीत धडकी भरत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ३ हजार २५४ नवीन रुग्णांचे निदान होऊन राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ झाली आहे.
मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील संसर्गवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. पुणे विभागात दिवसभरात ३६६ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २३०, तर सोलापूर १०७ रुग्णांची नोंद झाली. सातारा २०, सांगली ४ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. कोकणात सिंधुदुर्गमध्ये परत नवीन ११ रुग्णांची भर पडून कोरोनाग्रस्तांची संख्या १४६ झाली आहे.
राज्यात दिवसभरात १४९ मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३ हजार ४३८ झाली आहे. १४९ मृत्यूंमध्ये मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई विरार २, जळगाव ५, पुणे १०, औरंगाबाद ७, बीड १, अकोला २, अमरावती १ आणि गडचिरोली १, अशा रुग्णांचा समावेश आहे. १४९ रुग्णांमध्ये ९४ पुरुष, तर ५५ महिला आहेत. दिवसभरात १ हजार ८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एकूण ४४ हजार ५१७ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४६ हजार ७४ सक्रिय रुग्ण आहेत, तर मुंबईत हा आकडा २७ हजार १०९ आहे. राज्यात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३४ टक्के आहे, तर राज्याचा मृत्यूदर ३.६५ टक्के आहे.