स्नेहा मोरे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांवर आले आहे, मात्र दुसरीकडे अजूनही कोरोनाच्या रुग्ण निदानाची संख्या वाढताना दिसत आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात शून्य ते १० वयोगटातील २ हजार ६३१ बालकांना कोरोनाचा (कोविड-१९) संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तर ११ ते २० वयोगटातील ५ हजार १९५ लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे.राज्यात ८२ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत, या एकूण रुग्णसंख्येत दहा वर्षांपर्यंतचे रुग्णांचे प्रमाण ३.२९ टक्के आहे. तर ११ ते २० वयोगटातील कोरोना बाधितांचे प्रमाण ६.४९ टक्के आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. रागिणी जवळकोटे यांनी सांगितले, लहान मुलांना याचा धोका कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो; पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य आहेत. ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लूसारखी लक्षणे कोरोनामध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. लहान मुलांमध्ये मृत्यूदर कमी, म्हणजे ०.२ टक्के आहे. तोही कुपोषित, हृदय रोग, जन्मजात फुप्फुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.भरपूर पाणी प्याकोरोना म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीची परीक्षाच आहे. बारा वर्षांखालील मुले आणि वयस्कर नागरिकांना अधिक भीती आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी गर्दी करू नये. नवजात बालकांना आई आणि ठरावीक व्यक्तींशिवाय कोणीही हात लावू नये. बाळाला आईचेच दूध पाजावे म्हणजे आपसूकच विषाणूपासून संरक्षण होईल.