Join us

आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:37 AM

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे.

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे. डॉ. अंजली आणि अनिरुद्ध मालपानी दाम्पत्याने यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. डॉ. मालपानी हे केईएम रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असून सर्वसामान्य जोडपे जीवनशैली व अन्य बदलांमुळे मुलांपासून वंचित राहू नये, या विचारातून हे पाऊल उचलण्यात आले आहे.या नव्या केंद्राच्या उभारणीविषयी डॉ. अंजली मालपानी यांनी सांगितले की, स्त्रीरोगतज्ज्ञ एमडी विषयाची विद्यार्थिनी असताना वंध्यत्वाचे रुग्ण येत असत. १० ते १२ टक्के लोकांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. तत्कालीन डॉक्टरांना सिझेरियनबाबत आणि इतर आजारांबाबत शिकवले जात असे. परंतु, वंध्यत्वावर शिकवले जात नव्हते. वंध्यत्वावर देशात उपायच नव्हते. शिवाय संबंधित विषयावर प्रशिक्षणही दिले जात नसल्याचे डॉ. मालपानी म्हणाल्या.डॉ. मालपानी यांनी ३० वर्षांपूर्वी परदेशी जाऊन वंध्यत्व विषयावरील प्रशिक्षण घेतले. आता हे ज्ञान सर्वसामान्य जोडप्यांना उपयोगी पडावे यासाठी केईएम सर्वसाधारण रुग्णालयातून उपचार सुरू करत असल्याचे डॉ. मालपानी यांनी सांगितले. जगात आधुनिक शहरांमध्ये टेस्ट ट्यूूब बेबी, स्पर्म डोनेशन बँकसारख्या गोष्टी सुरू आहेत. आपल्या देशातही वंध्यत्व उपचार व प्रशिक्षणावर सर्वसामान्य रुग्णांना फायदा होईल, असे काही व्हावे. यासाठी पालिका प्रमुखांना आणि केईएम अधिष्ठात्यांसमोर प्रस्ताव ठेवला. तो त्यांनी मान्य केला आहे. आयव्हीएफ केंद्र उभारण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, दरवर्षी ५० लाख रुपये या केंद्राला दिले जाणार आहेत. तसेच या रुग्णालयात साधारण १०० जोडप्यांवर दरवर्षी उपचार करण्यात येतील. या केंद्रातून निवासी डॉक्टरांना आयव्हीएफ उपचार पद्धतीचे प्रशिक्षण व संशोधनात्मक ज्ञान दिले जाणार आहे.

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबई