मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयातील नागरिक कक्षात चहा-पाणी मिळाले नाही म्हणून सभागृहात घुसखोरी करणाऱ्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला काशिमीरा पोलिसांनी पूर्वीच्या दोन गुन्ह्यात अटक केली आहे. शिवाय पालिकेच्या शिपायास निलंबित करण्यात आले आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत नगरसेवक, पदाधिकारी आदींना सकाळ पासून पाणी, चहा, नाष्टा, जेवण आदी मिळत असते. पत्रकार व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सदर सुविधा मिळते. परंतु, प्रेक्षक गॅलरीत बसणाऱ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना पाण्या पासून चहा, नाश्ता, जेवण आदी व्यवस्था देणे शक्य नसते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनी नुसार सर्वसाधारण महासभा सोमवारी आयोजित करण्यात आली असता दुपारी पावणे तीन च्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाचे मीरा भाईंदर अध्यक्ष श्रीनिवास निकम हे प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्या ठिकाणी चहा, पाणी आदी दिले जात नसल्याने त्यांनी नगरसचिव कार्यालयातील शिपाई मधुकर भोईर यांना सांगितले. भोईर यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली. परंतु, निकम ऐकत नसल्याने आपण सचिवांना जाऊन विचारतो असे भोईर म्हणाले.
भोईर सभागृहात जात असताना त्यांच्या मागेच निकम हे महासभेत जाऊन थेट सभागृहातील व्यासपीठावर चढले आणि चहा-पाणी दिले जात नसल्या बद्दल हुज्जत घालू लागले. परवानगी नसताना निकम याच्या घुसखोरीने सभागृहात एकच खळबळ उडाली. नगरसेवक संताप व्यक्त करू लागले. त्या नंतर निकम यास बाहेर काढण्यात आले व भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. निकम यांनी मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यानेच आपल्याला आत सोडल्याचे सांगितले. महापौरांसह नगरसेवकांनी पालिकेच्या सुरक्षा रक्षकां बद्दल संताप व्यक्त करत सभागृहात बाहेरच्या व्यक्तीला सोडलेच कसे ? असा संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवकांनी काहीकाळ ठिय्या आंदोलन करत निषेध केला.
दरम्यान, नगर सचिव कार्यालयातील शिपाई मधुकांत भोईर ह्याना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर निकम विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. निकम वर काशीमीरा पोलीस ठाण्यात दोघं भावांना मारहाण केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना निकम हा भाईंदर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळताच पोलीस पाठवून त्याला अटक केली.