विस्तारित भाजी मार्केटमध्ये घुसखोरी

By admin | Published: October 10, 2015 12:55 AM2015-10-10T00:55:52+5:302015-10-10T00:55:52+5:30

बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये परप्रांतीय कामगारांनी घुसखोरी केली आहे. विनापरवाना अनेकांनी वास्तव्य सुरू केले आहे.

Infiltration in the extended vegetable market | विस्तारित भाजी मार्केटमध्ये घुसखोरी

विस्तारित भाजी मार्केटमध्ये घुसखोरी

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या विस्तारित भाजी मार्केटमध्ये परप्रांतीय कामगारांनी घुसखोरी केली आहे. विनापरवाना अनेकांनी वास्तव्य सुरू केले आहे. गुंडांचा वावरही वाढला असून, मार्केट मद्यपींचा अड्डा बनले आहे. गॅस व स्टोव्हच्या वापरामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी प्रशासनाने २८५ गाळ्यांचे विस्तारित मार्केट बांधले आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. परंतु व्यापाऱ्यांनी एक महिनाही नवीन मार्केटमध्ये व्यापार केला नाही. ग्राहक येत नसल्याचे कारण सांगून सर्वांनी पुन्हा जुन्या मार्केटमध्ये गाळे भाड्याने घेऊन व्यापार सुरू केला. चार वर्षांमध्ये पुन्हा मार्केट सुरू होऊ शकले नाही. व्यापाऱ्यांनी त्यांचे गाळे निर्यातदारांना पॅकिंगसाठी भाड्याने दिले आहेत. येथे जवळपास ३०० परप्रांतीय कामगार वास्तव्यास आले आहेत. गाळ्यांच्या वर असलेल्या पेढ्यांचा वापर कामगारांचे निवासस्थान म्हणून केला जात आहे. येथील एकही कामगाराची नोंद बाजार समिती प्रशासनाकडे नाही. हे कामगार कोणाकडे काम करतात, त्यांना पेढ्यांमध्ये राहण्याची परवानगी कोणी दिली, याचाही तपशील उपलब्ध नाही. परप्रांतीय कामगारांनी घुसखोरी केली असून, ते याच ठिकाणी गॅस व स्टोव्हचा वापर करून स्वयंपाक करीत आहेत. यामुळे मार्केटमध्ये स्फोटची किंवा आगीची भीती व्यक्त केली जात आहे.

१) परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे मार्केटची सुरक्षा धोक्यात आली आहे. मार्केटमध्ये सायंकाळी ५ नंतर कोणालाही थांबण्याची परवानगी नाही. परंतु या ठिकाणी परप्रांतीय कामगार बिनधास्तपणे मुक्काम करीत आहेत.
२) रात्रभर त्यांचे मार्केटमध्ये ये - जा सुरू असते. येथील पाणी व इतर सुविधांचाही मोफत वापर केला जात आहे. विस्तारित भाजी मार्केटमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. येथील गाळ्यांमध्ये काही टपोरी तरुण दिवसभर मद्यपान करीत बसलेले असतात.
३) दारू पिताना कोणी हटकले तर त्यांनाच धमकी दिली जात आहे. बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांचेही जुमानले जात नाही. या टपोरींची मार्केटमध्ये दहशत असल्यामुळे कोणीही त्यावर आक्षेप घेत नाही.
४) निर्यातदारांमुळे मार्केटमध्ये प्रचंड कचरा होत असून, त्याची साफसफाई बाजार समिती प्रशासनास करावी लागत आहे.
५) सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मार्केटमधील घुसखोरीकडे बाजार समिती प्रशासन व पोलीसही दुर्लक्ष करू लागले आहेत.

गुंडांना शेठजीचे अभय
मार्केटमध्ये दिवसभर गुुंडांचा वावर असतो. येथील दोन गाळ्यांमध्ये दिवसभर मद्यपान सुरू असते. सर्वांसमोर मार्केटमध्ये दारू पिणाऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाहीत. येथील एक गाळाधारक व्यापाऱ्याने या टपोरींना आश्रय दिला आहे. ती शेठजींची माणसे असून, त्यांना काय बोलले तर दादागिरी करतात, अशी माहिती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिली. गुुंडांना अभय देणाऱ्या शेठजीवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मार्केटची झाली धर्मशाळा
विस्तारित भाजी मार्केटची धर्मशाळा झाली आहे. विनापरवानगी जवळपास ३०० जण येथे मुक्काम करीत आहेत. जे कामगार येथे काम करीत नाहीत तेही मुक्कामासाठी येथे येत आहेत. कोणाचीही नोंद गाळा मालक, बाजार समिती प्रशासन व पोलिसांकडेही नाही. भविष्यात येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती व बांगलादेशी नागरिक वास्तव्य करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Web Title: Infiltration in the extended vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.