मूर्तिकारांवर अनंत अडचणींमुळे ‘विघ्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:23+5:302021-07-12T04:05:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबापुरीत आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, श्री गणेशमूर्तींसह देवीच्या मूर्ती तयार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबापुरीत आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, श्री गणेशमूर्तींसह देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांनी कंबर कसली आहे. तत्पूर्वी श्री गणेशाच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना मंडप उभारण्याकरिता अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचा फटका मूर्तिकारांना बसत असून, कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या मूर्तिकारांवर अनंत अडचणींमुळे ‘विघ्न’ ओढावले आहे.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील मूर्तिकार मे महिन्यापासूनच गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू करतात. ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जागा असते, अशा मूर्तिकारांना अडचणी येत नाहीत. बहुसंख्य मूर्तिकार हे पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हाधिकारी अथवा तत्सम जागेवर मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागतात. ही प्रक्रियादेखील मे महिन्यापासूनच सुरू होते. गेल्या वर्षी मंडपासाठीचे परवाने ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने मिळत होते. मात्र, यावर्षी विलंबाने परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षी परवान्यांसाठी महापालिकेची एक खिडकी योजना कार्यान्वित होती. मात्र, यंदा अद्याप एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. आता जुलै महिना अर्धा संपत आला तरीदेखील गणेश मूर्तिकारांना मंडपासाठीचे परवाने अद्याप हाती आलेले नाहीत. एक खिडकी योजना नसल्याने मूर्तिकारांना शंभर ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. मुंबईत बहुतांश ठिकाणी मंडप हे महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर बांधले जात असले तरी बहुसंख्य मूर्तिकारांची लगतच्या सोसायट्यांकडून आडकाठी केली जात आहे. विविध कारणे पुढे करीत सदर सोसायट्या मंडप बांधण्यास विरोध करीत असल्याने प्रशासकीय यंत्रणेने यात लक्ष घालावे, अशी मागणी मूर्तिकार संघटनेकडून केली जात आहे.
---------------
- मूर्ती तयार करण्यासाठी चार महिने लागतात.
- मातीची एक मूर्ती तयार करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात, तसेच ती सुकण्यासाठी आठ दिवस लागतात.
- मागच्या वर्षी विलंबाने परवानगी मिळाली. यंदादेखील तोच कित्ता गिरविला जात आहे.
- शासनाचे सगळे नियम मूर्तिकार पाळत आहेत. तरीही मूर्तिकारांकडून हमीपत्र मागितले जाते.
- रिक्षावाल्यांना १ हजार ५०० रुपये मिळतात. मग मूर्तिकारांना का मिळत नाहीत.
---------------
- मुंबईतील मूर्तिकारांची संख्या ५०० वर आहे.
- मुंबईत मंडपांची संख्या ३०० आहे.
- प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आहे की नाही याबाबत पुरेशी स्पष्टता नाही.
- मूर्तिकारांनी व्यवसायासाठी बँकांचे कर्जदेखील घेतले आहे.
---------------
मूर्तिकार सरकारवर नाराज
गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी सरकारी मदत अपेक्षित आहे. मात्र, मूर्तिकारांना काहीच मदत मिळाली नाही. मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात परवानगी मिळते. कोरोनामुळे दीड वर्षांपासून मूर्तिकार घरात बसून आहेत. परवानगी लवकर मिळाली तर काम लवकर सुरू होईल. मूर्तिकारांना डावलेले जात आहे. त्यामुळे सरकारवर मूर्तिकार नाराज आहेत.
- राहुल राजेंद्र घोणे, खजिनदार, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना
---------------
एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत
शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना आम्हाला विचारत घेणे गरजचे होते. आता घेतले जात असलेले निर्णय हे एकतर्फी आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणे गरजेचे आहे. मंडपाबाबतदेखील अडचणी आहेत. मूर्तिकारांसमोर आर्थिक अडचणी आहेत. समन्वय नसल्यामुळे याचा फटका सगळ्यांना बसतो आहे.
- अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती
---------------
फक्त विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी नाही
गणेशोत्सव / नवरात्रोत्सवावेळी मूर्ती तयार करून विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरूपाचे मंडप बांधण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयातून देण्यात येणाऱ्या परवानग्या गत वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील ऑफलाइन पद्धतीने देण्यात येणार आहेत. या पद्धतीने देण्यात येणाऱ्या परवानग्या स्वतः मूर्ती तयार करून विक्री करणाऱ्या मूर्तिकारांनाच देण्यात येतील, तसेच तयार मूर्ती बाहेरून आणून फक्त विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी मान्य करण्यात येणार नाही.
---------------
शुल्काबाबतचे परिपत्रक
मूर्तिकारांना मंडपाकरिता परवानगी देण्यासाठी २०२१ करिता लागू असलेल्या विविध स्तरीय शुल्काबाबतचे परिपत्रक महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे, तसेच सदर परिपत्रक हे महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis संकेतस्थळावर आहे.