कोरोनाच्या काळात महागाईच्या झळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:57 PM2020-06-04T17:57:50+5:302020-06-04T17:58:21+5:30
किराणा सामानासह अन्य वस्तूंची चढ्या भावाने विक्री; ७२ टक्के ग्राहकांनी नोंदविले आक्षेप
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लाँकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तू आणि किराणा सामानाची खरेदी करताना एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचे मत ७१ टक्के ग्राहकांनी नोंदवले आहे. मुळ उत्पादकांनी वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केली नव्हती. मात्र, किरकोळ व्यापा-यांनी सवलती रद्द करून जास्त दराने विक्री केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, लाँकडाऊनच्या या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली नव्हती असेही मत २५ टक्के लोकांनी नोंदवले आहे.
लोकल सर्कल या संस्थेने २१० जिल्ह्यांतील विविध उत्पन्न गटातल्या सुमारे १६ हजार ५०० ग्राहकांशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात ४६ टक्के महिला आणि ५४ टक्के पुरूषांचा समावेश होता. महानगरांमधिल ३२ टक्के लोकांनी त्यात आपले अभिप्राय नोंदविले आहेत. लाँकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ५३ टक्के ग्राहक जवळच्या किराणा दुकानातूनच साहित्याची खरेदी करतील असे निरीक्षण आहे. तर, आँनलाईन (१७ टक्के) आणि रिटेल स्टोअरमधून आँनलाईन खरेदी (८ टक्के) प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे लाँकडाऊनच्या काळात सोसायटीच्या आवारात किराणा दुकाने सोसायट्यांच्या दारापर्यंत आली. त्या माध्यमातूनच पुढील खरेदी करण्याचा मानस १८ टक्के ग्राहकांनी व्यक्त केला आहे. २८ टक्के ग्राहकांना कोरोनाच्या दहशतीमुळे दुकानांमध्ये जाण्याची इच्छा नसून घरपोच साहित्य मिळविण्याकडेच त्यांचा कल असेल असेही हा अहवाल सांगतो.
सवलती पुन्हा दाखल होतील
दुकानदारांकडून वस्तूंच्या खरेदीवर दिल्या जाणा-या विविध सवलती लाँकडाऊनच्या काळात बंद करण्यात आल्या होत्या. अँमेझाँन पॅण्ट्री अँण्ड फ्रेश, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, ग्लोफर्स या ई काँमर्स कंपन्यांचा मुकाबला करण्यासाठी किरकोळ दुकानदारही काही सवलती पूर्वी देत होते. मात्र, ई काँमर्सलाही लाँकडाऊनचा तडाखा बसल्यामुळे किरकोळ व्यापा-यांनीसुध्दा सवलती रद्द केल्या होत्या. परंतु, आता ई काँमर्सही सुरू होत असल्याने या सवलतीसुध्दा पुन्हा दाखल होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.