मुंबई : उन्हाळा लागताच अनेक घरांमध्ये गृहिणी पापडांबरोबरच वर्षभरासाठी पुरेल एवढा मसाला तयार करून ठेवत असतात. तसेच जून-जुलैमध्ये कैरीचे लोणचे घरोघरी टाकले जाते. मात्र यावर्षी महागाईचा ठसका सर्व वस्तूंना बसू लागला आहे.
सध्या पेट्रोलसह गॅसही महागला आहे. त्यापाठोपाठ आता मिरची-मसाल्याचे दर गगनाला भिडल्याने, लोणचे तसेच वर्षभराचा मसाला कसा तयार करावा, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तयार करण्यात येणाऱ्या मसाला, तिखटामुळे बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र आता ही उलाढाल ठप्प होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, मिरची व मसाल्याचे दर यावर्षी वाढल्याने, अनेक गृहिणींनी यावर्षी वर्षाचे तिखट-मसाले तयार करण्याचे नियोजन रद्द केल्याचे सांगितले.
राज्यातून आणि राज्याबाहेरून येते मिरची
संकेश्वरी, बेडगी, लवंगी, काश्मिरी, पांडी या मिरच्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रसह, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतून या मिरच्या मुंबईतील बाजारांत फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी दाखल होतात. यंदाही या मिरच्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
सर्व मसाल्यांच्या भावात १० ते २० टक्के वाढ
मार्च महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला बनविण्याची तयारी सुरू होते. याकाळात लाल मिरची तसेच गरम मसाल्याच्या जिन्नसांना मोठी मागणी असते. दरम्यान लाल मिरचीच्या उत्पादनात झालेली घट आणि इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्व मसाल्यांच्या भावात १० ते २० टक्के वाढ झाली आहे.
- ऋषी ठक्कर, व्यापारी
आमच्याकडे दरवर्षी उन्हाळ्यातच मिरची खरेदी करून घरगुती तिखट तयार केले जाते. तसेच मसालेही काही प्रमाणात तयार केले जातात. परंतु मिरचीचे दर वाढल्याने, तिखट तयार करण्याचा विचार नाही.
- अंजली माने,गृहिणी
आमचे मोठे कुटुंब आहे. त्यामुळे आम्ही तिखट, मसाले घरीच तयार करीत असतात. घरी तयार केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट असतात. मात्र मसाल्याचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे यावर्षी तयार मसाला घेऊ.
- नम्रता काटकर, गृहिणी
मिरचीचे दर (प्रती किलो)
बेडगी (साधी) -२८०
बेडगी (अस्सल) -३८०
काश्मिरी -४६०
लवंगी -२८०
मसाल्याच्या पदार्थ्यांचे दर (प्रती किलो)
धने-२००
जिरे-२४९
तीळ -१८०
खसखस -१६००
खोबर -२१०
मेथी -१२०
हळद -२००
गरम मसाल्यांचे पदार्थ (प्रती दहा ग्रॅम)
लवंग -१०
चक्रीफुल -२०
बडीशेप -३
नागकेशर -३७
दगडफूल -५
वेलदोडे -२८