Join us

महागाईने तेल ओतले, घरातले बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:09 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात महागाई वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोनाकाळात स्वयंपाक घरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. ...

मुंबई : कोरोनाच्या काळात महागाई वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोनाकाळात स्वयंपाक घरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. खाद्यतेल, धान्य, शेंगदाणे, साखर, साबुदाणा, चहापूड, डाळ, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये दरवाढ झाल्यामुळे स्वयंपाकघरातील खर्चदेखील वाढला आहे. या कारणांमुळे गृहिणींचे आर्थिक बजेटदेखील कोसळले आहे.

सध्या वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. याचा परिणाम म्हणून बाजारामध्ये महागाई वाढलेली आहे.

* डाळीशीवाय वरण

सध्या बाजारामध्ये डाळींच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. तूरडाळ प्रतिकिलोमागे १२० रुपयांवर पोहोचली आहे. मूगडाळ प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोसळले आहे.

सिलिंडर हजाराच्या घरात

सध्या गॅसच्या किमती हजाराच्या उंबरठ्यावर पोहचल्या आहेत. सातत्यानं गॅसच्या किमती वाढू लागल्या कारणामुळे गॅस कसा भरायचा हा प्रश्न सामान्यांपुढे निर्माण झाला आहे. गॅसच्या किमती वाढू लागल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोसळले आहे.

काय म्हणतात गृहिणी

शशिकला गुप्ता म्हणाल्या की सध्या महागाई वाढत आहे, मात्र यावर काय करणार जस चालत आहे तस चालवाव लागत आहे. तूरडाळ, मूगडाळ तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने घरी मॅनेज करताना अनेक अडचणी येत आहेत, मात्र काहीही करून घर चालवावेच लागेल.

- शशिकला गुप्ता, गृहिणी