देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:21 PM2023-10-10T13:21:44+5:302023-10-10T13:22:45+5:30
देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबापुरीला आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील देवीच्या मूर्ती कार्यशाळेत मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. तत्पूर्वी काही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या मूर्ती मंडपात दाखल झाल्या असल्या, तरीदेखील येत्या शनिवारी आणि रविवारी उर्वरित मूर्तीदेखील मंडपाची वाट धरणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.
मूर्ती तयार करणारे बहुतांशी कारागीर हे उत्तर भारतातील असून, एका कारागिराला कमीत कमी ४०० आणि अधिकाधिक १२०० रुपये दिवसाला द्यावे लागत आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर न मिळणे सर्वात मोठे आव्हान असून, कार्यशाळेसाठी मंडप उभारण्याकरिता महापालिकेकडून विलंबाने मिळणारी परवानगी ही देखील अडचण असल्याची खंत मूर्तिकारांनी बोलून दाखवली आहे. याव्यतिरिक्त मुंबई महापालिकेकडून देवीच्या मूर्ती बनविण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या शाडूच्या मातीची किंमत ही कमी असावी, अशी मागणीदेखील बहुतांश मूर्तिकारांनी केली आहे.
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीदेखील विलंब न करता देवीसाठीच्या कामाचे नियोजन काही महिन्यांपूर्वीपासून करून ठेवावे. जेणेकरून मूर्ती तयार करण्यासाठी वेळ लागणार नाही, याकडेदेखील मूर्तिकारांनी लक्ष वेधले आहे.
मूर्ती जितकी मोठी तितका वेळ जास्त
- मूर्तीला रंग देण्यासाठी ऑइल पेंट आणि वॉटर कलरचा वापर केला जातो. एका मूर्तीवर कमीत कमी रंगाचे चार हात मारले जातात.
- मूर्ती लहान असेल तर रंग काम करण्यास कमी वेळ लागतो; मूर्ती जितकी मोठी असेल तर जास्त वेळ लागतो.
कला आपण शिकूया
देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना उत्तर भारतातील राज्यातून बोलवावे लागते.
मुंबईतील मुलांनी ही कला शिकली तर बाहेरच्या राज्यातील कारागिरांना या कामी बोलवावे लागणार नाही.
त्यामुळे स्थानिक लोकांनीदेखील या कलेकडे वळावे जेणेकरून यातून आर्थिक उत्पन्न आणि समाधानदेखील मिळेल, असे मूर्तिकारांनी सांगितले.
महागाईची झळ बसण्याचे कारणे
- रंगाचे दर वाढतात.
- कारागिरांचे मानधन वाढते.
- जागाचे भाडे द्यावे लागते.
- लाईट बिल द्यावे लागते.
- मंडळ ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे मूर्ती तयार करावी लागत असल्याने मूर्तीच्या दरात वाढ होते.
- कारागिरांच्या चहापाण्यासह जेवणाचा खर्च असतो.
- इतर अनेक लहान सहान खर्च असतात.
पीओपीचे खूप प्रकार आहेत. मात्र मूर्ती तयार करण्यासाठी मध्यम स्वरूपाचे पीओपी वापरले जाते. एक मूर्ती तयार करण्यासाठी किमान एक आठवडा लागतो. मूर्ती तयार करण्यासाठी काथ्या देखील वापरला जातो.
देवीची मूर्ती तयार करण्यासाठी एका कामगाराला किमान चारशे रुपये द्यावे लागतात. कमाल १२०० रुपये द्यावे लागतात. एका मूर्ती कार्यशाळेमध्ये कमी चार ते पाच कारागीर असतात. कार्यशाळा जेवढी मोठी असते; तेवढी कामगारांची संख्या अधिक असते.
पीओपीची एक गोणी २० किलोची असते. या गोणीची किंमत २०० रुपये असते. १ मूर्ती तयार करण्यासाठी ५ गोण्या लागतात. मूर्तीची उंची यावर देखील किती पीओपी लागणार हे ठरते.