उन्हाळ्यात महागाईचा चटका! डाळींचे दर २०० रुपयांजवळ, खानावळ चालवणे झाले अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:32 AM2024-05-27T09:32:01+5:302024-05-27T09:33:39+5:30
दिवसेंदिवस डाळींच्या किमती वाढतच असल्याने आता डाळींचे जेवणही आवाक्याबाहेर जाते का, अशी सर्वसामान्यांची गत झाली आहे.
मुंबई : सर्वसामान्यांच्या जेवणातील डाळीची चव बेचव होऊ लागली आहे. दिवसेंदिवस डाळींच्या किमती वाढतच असल्याने आता डाळींचे जेवणही आवाक्याबाहेर जाते का, अशी सर्वसामान्यांची गत झाली आहे. डाळींची ही भाववाढ कमी कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
सर्वसामान्य कुटुंबात आणि खानावळीतील जेवणात वरण-भात हा नित्याचाच भाग असतो. मात्र त्यासाठी लागणाऱ्या तुरीच्या डाळीचे दर चांगलेच वाढले असून आता २०० रुपये प्रतिकिलो जवळ पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो तुरीच्या डाळीसाठी तब्बल १९० रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारातही तुरीची डाळ १७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चवळी, उडीद, मूग या सर्वांचेच दर चढे असून यंदा बाजार चांगलाच वधारला आहे.
१) सद्य:स्थितीत मसूरडाळीसाठी १०० ते ११० रुपये खर्ची पडत आहेत. गेल्या वर्षी घाऊक बाजारात ७५ ते ११५ रुपयांना मिळणारी तूरडाळ यंदा ११० ते १७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
२) तर घाऊक बाजारात गेल्या वर्षी मे महिन्यात मूगडाळीचे दर ८० ते ११० रुपये होते. यंदा हे दर ९५ ते १४० रुपयांवर गेले आहेत. गेल्या वर्षी १२५ ते १५० रुपयांपर्यंत तूरडाळ मिळत होती. आता ती २०० पर्यंत पोहोचली आहे. महागडी डाळ खरेदी करून खानावळी चालविणे जिकिरीचे झाले आहे. हेच दर राहिल्यास जेवणाच्या थाळीचे दर वाढविण्याशिवाय गत्यंतर नसेल, असे खानावळ चालक शशिकला गुरव यांनी सांगितले.