मुंबई : घाऊक किंमत-आधारित महागाई वाढत असून, त्याचा दबाव म्हणून किरकोळ महागाई आणखी वाढण्याची भीती असल्याचा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी दिला आहे.
आपल्या वार्षिक अहवालात आरबीआयने म्हटले आहे की, औद्योगिक कच्च्या मालाच्या उच्च किमती, वाहतूक खर्च, युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यांमुळे महागाईवर दबाव वाढत आहे. युद्धामुळे भारतासह जगभरातील महागाई वाढत आहे. इंधन, भाजीपाला आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिलमध्ये घाऊक महागाईने १५.०८ टक्क्यांची विक्रमी पातळी गाठली आहे. त्याच वेळी, किरकोळ महागाई ७.७९ टक्क्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने या महिन्यात रेपो दरात वाढ केली असून, येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बैठकीतही पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे.