मुंबई : गेल्या काही दिवसांत सिंगापूर आणि कतार विमान कंपन्यांच्या विमान प्रवासादरम्यान एअर टर्ब्युलन्समुळे प्रवाशाचा झालेला मृत्यू आणि जखमींची वाढती संख्या लक्षात घेता आता इंडिगो कंपनीने ‘एअर टर्ब्युलन्स’साठी एक विशेष सॉफ्टवेअर प्रणालीची चाचणी सुरू केली आहे. यामुळे वैमानिकांना एअर टर्ब्युलन्सची व्यवस्थित माहिती मिळू शकेल.
वातावरणात झालेल्या बदलांमुळे काही दिवसांत ‘एअर टर्ब्युलन्स’च्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, यामुळे अपघात होऊ नये, यासाठी ‘इंडिगो’ने प्रायोगिक पातळीवर या सॉफ्टवेअरची चाचणी सुरू केली आहे. सध्या वैमानिकांना रडार तसेच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाद्वारे सर्व माहिती प्राप्त होते. मात्र, या सॉफ्टवेअरमुळे प्रवासादरम्यान जर ‘एअर टर्ब्युलन्स’ची परिस्थिती समोर आली तर त्याची तीव्रता किती आहे, त्याचे नेमके ठिकाण काय आहे, किती उंचीवर ती परिस्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती वैमानिकाला मिळू शकणार आहे.