अंटार्क्टिक खंडाची माहिती लघुपटातून
By Admin | Published: October 22, 2014 01:42 AM2014-10-22T01:42:09+5:302014-10-22T01:42:09+5:30
अंटार्क्टिका - अॅन अॅडव्हेंचर आॅफ डिफरन्ट नेचर’ हा ४० मिनिटांचा चित्रपट आहे. या चित्रपटात अंटार्क्टिकाचा इतिहास, तेथील परिसराचे विज्ञान, पर्यावरण आणि सौंदर्य अशा विषयांचा समावेश आहे
मुंबई : भूगोलाचे दर्शन केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता त्यापलीकडेही मुलांना ज्ञान मिळावे, या स्तुत्य उद्देशाने नेहरू विज्ञान केंद्राने ‘अंटार्क्टिका - अॅन अॅडव्हेंचर आॅफ डिफरन्ट नेचर’ या लघुपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त आयोजित या उपक्रमात दिवसभरात पाच खेळ दाखवले जातील.
‘अंटार्क्टिका - अॅन अॅडव्हेंचर आॅफ डिफरन्ट नेचर’ हा ४० मिनिटांचा चित्रपट आहे. या चित्रपटात अंटार्क्टिकाचा इतिहास, तेथील परिसराचे विज्ञान, पर्यावरण आणि सौंदर्य अशा विषयांचा समावेश आहे. तसेच तेथील हवामानाचा प्राणीजीवनावर कसा परिणाम होतो, याची माहितीही देण्यात आली आहे. या खंडात विविध विषयांवर सुरू असणाऱ्या संशोधनाबद्दल चित्रपटाद्वारे लहान मुलांना मार्गदर्शन मिळेल.
दरवर्षी दिवाळीच्या सुटीनिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन होते. एका मोठ्या डोमवर हा लघुपट दाखविला जातो, जेणेकरून प्रेक्षकांना त्या लघुपटाचाच भाग असल्याची अनुभूती येते. ‘अंटार्क्टिका - अॅन अॅडव्हेंचर आॅफ डिफरन्ट नेचर’ हा लघुपट इंग्रजी, हिंदी या भाषांमध्ये दाखविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)