‘त्या’ वृक्षतोडप्रकरणी होणार कारवाई , सहायक पालिका आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:40 AM2019-05-09T06:40:32+5:302019-05-09T06:40:46+5:30
गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केल्याच्या आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केल्याच्या आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन नियमानुसार संबंधितांवर कारवाई करेल, असे पी दक्षिण विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इंडोमॉल साईन इंडिया या कंपनीकडे ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्याचे कंत्राट आहे. फिल्मसिटी येथील शिवमैदान येथे हा सेट उभारण्याचे काम सुरू आहे. कंपनीने २९ एप्रिलच्या रात्री येथे वृक्षतोड करून सेट उभारल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजकिरण साळवे यांनी केली आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये बुधवार, ८ मेच्या अंकात ‘बिग बॉसच्या सेटसाठी फिल्मसिटीत वृक्षतोड’ या शीर्षकाअंतर्गत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल घेत पी दक्षिण विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांनी बुधवारी दुपारी उद्यान विभागाचे संदेश जाधव यांना वृक्षतोडीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पाठविले. अहवाल आल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आरे पोलिसांत
तक्रार दाखल
फिल्मसिटीचे सहसंचालक निवृत्ती मराले यांनी सांगितले की, येथील वृक्षतोडीबाबत आम्ही पी दक्षिण विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शिवाय आरे पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.