‘त्या’ रुग्णालयांची माहिती ॲपवर; धर्मादाय रुग्णालयांना आता बसणार चाप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 07:17 AM2023-08-25T07:17:17+5:302023-08-25T07:17:38+5:30
पारदर्शी काम व्हावे म्हणून ॲप रुग्णांच्या सेवेत येणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी रुग्णालयांची अद्ययावत माहिती ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. मंत्रालयात बुधवारी धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, नॅशनल हेल्थ मिशन २०२३-२४ सद्य:स्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या आराखड्याच्या सादरीकरणासाठी बैठक झाली. आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे म्हणून ॲप करण्यात आले आहे. हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे.
केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महाजन उपस्थित होते.
- या ॲपद्वारे रुग्णांना नजीकचे धर्मादाय रुग्णालय, तेथील उपलब्ध सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रूम, आरोग्य दूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला या संदर्भात माहिती एकाच वेळी मिळणार आहे.
- भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे.