कोरोना विषयी माहिती देणारा ‘आरोग्य सेतू’ अँप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:45 PM2020-04-05T18:45:53+5:302020-04-05T18:46:23+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने ‘आरोग्य सेतू’ ॲप तयार केले आहे.
अँप डाउनलोड करण्याचे भारतीय रेल्वेकडून आवाहन
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने ‘आरोग्य सेतू’ ॲप तयार केले आहे. हे अँप डाउनलोड करण्याचे आवाहन भारतीय रेल्वेकडून केले आहे. रेल्वे कर्मचारी आणि सर्व नागरिकांनी हा अँप मोबाईलमध्ये घेऊन कोरोना विषयी माहिती मिळवू शकतात. ‘आरोग्य सेतू’ अँप मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
‘आरोग्य सेतू’ या मोबाईल अँपच्या माध्यमातून कोरोना विषाणूचे संक्रमण ओळखण्यासाठी मदत होईल. या अँपमध्ये कोरोनाविषयीची लक्षणांची माहिती देण्यात आली आहे. मोबाईलमध्ये अँप इंस्टॉल केल्यावर ॲप्लिकेशन विविध माहितीचे संकलन करणे व आवश्यक त्या सूचनेचे प्रसारण करते. या अँपद्वारे कोरोनाविषयीची जोखीम कितपत आहे. याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. ‘आरोग्य सेतू’ ॲप कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करेल. तसेच हे ॲप युजर्सच्या ब्लूटूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशन वरून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? या बाबी तपासेल. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा. ॲप डाऊनलोड करून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे , असे आवाहन भारतीय रेल्वेकडून करण्यात आलेले आहे.
…………..……
मध्य रेल्वेची 'रेल्वे कुटुंबीय देखरेख' मोहीम
मध्य रेल्वेने ‘रेल्वे कुटूंबीय देखरेख’ मोहीम या नावाने एक योजना सुरू केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अंदाजे एक लाख कर्मचार्यांच्या राहत्या पत्त्यासह (रेल्वे वसाहतीत आणि रेल्वे वसाहतींमध्ये न राहणारे) त्यांच्या मोबाइल क्रमांकासह मॅपिंग करण्यात येत आहे. रजा मंजूर करणा-या प्राधिका-याद्वारे (युनिट निहाय) मोबाईलवरुन त्यांची रोजची उपस्थिती सुरू केली आहे. यासह त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या आरोग्याबद्दल दररोज अहवाल देतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या रेल्वे रूग्णालयात आणले जाईल.
वैद्यकीय अधिकार्यांसह वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, विविध सर्व वसाहतीत काळजीवाहू समिती कार्यरत करण्यात आली आहे.