मुंबई : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे (पीएमसी) १६ लाख खातेदार ८० दिवसांपासून स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी बँकेत हेलपाटे घालत आहेत. संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा ७८ टक्के खातेधारकांना त्यांचे पैसे देण्यात आल्याची खोटी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सोमवारी केला.
पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई काँग्रेसने सोमवारी आझाद मैदान येथे निदर्शने केली. या वेळी गायकवाड म्हणाले, ७८% पीएमसी बँक खातेधारकांचे पैसे त्यांना परत देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांचे विधान बेजबाबदारपणाचे आहे. असे झाले असेल तर मग सध्या बँकेत असलेल्या ११ हजार कोटींचे जे डिपॉजिट आहे ते केवळ २२% खातेधारकांचे आहे का, असा सवाल गायकवाड यांनी केला.
बँकेत पैसे अडकल्यामुळे खातेदारांची आर्थिक गैरसोय होत आहेत. अनेक खातेदार तणावाखाली आहेत. खातेदारांचे मोठ्या प्रमाणावर बँकेत अडकलेले पैसे त्यांना कधी परत मिळणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.पीएमसी बँकेसाठी आता सरकारकडून रिव्हायव्हल पॅकेज जाहीर करण्यात यावे. तसेच ही बँक अन्य एखाद्या सशक्त सहकारी बँकेमध्ये विलीन करावी, जेणेकरून खातेदारांना दिलासा मिळेल, अशी मागणीही गायकवाड यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन पीएमसी बँकेच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केला. पीएमसी बँकेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचेही सप्रा यांनी सांगितले.या वेळी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा, कचरू यादव, राजेश ठक्कर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.