लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्नेकहब मोबाइल अॅपमध्ये एकूण १८३ सर्प प्रजातींची माहिती अँड्रॉइड प्लेस्टोर्समध्ये सादर करण्यात आली असून, यात महाराष्ट्रातील संपूर्ण ७२ सर्प प्रजातींचा समावेश आहे. नागरिकांस व संस्थांस सर्पसंरक्षणविषयी जागरूक करणे हा यामागील उद्देश आहे. सर्पदंश कसे टाळावेत, अडचणीतील सापांची व मानवांची सुटका कशी करावी आणि सर्पदंश झाल्यास काय करावे यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
भारतीय सापांची संपूर्ण माहिती तीन भाषांत असणारे तसेच सापांचे शरीरशास्त्र, विविध राज्यांत असणारे सापांविषयीचे समज-गैरसमज, सर्पदंश व उपचार याची माहिती असणारे हे अॅप आहे. राज्यानुसार आढळणारी सापांची शरीरवैशिष्ट्ये व श्रद्धा-अंधश्रद्धा समजावून सांगितली आहेत. त्यामुळे सर्वसाधारण वैश्विक व प्रादेशिक दोन्ही माहिती मिळते. सापांचा नैसर्गिक इतिहास, शरीररचना, विस्तार, रंजक माहिती यात असून, ही सर्व माहिती हजारो शास्त्रीय संशोधने, पुस्तके, लिखाणातून, नोंदीतून शास्त्रीय आधार लावून निवडली आहे. ८ वर्षांच्या बालकापासून ते सर्पसंशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षक यांना कळेल अशा भाषेत ही माहिती रचली आहे. आजघडीला स्नेकहब भारतातील सापांविषयीचा सर्वात मोठा व शास्त्रीय भारतीय माहितीकोश आहे, असा दावा केला जात आहे.
...........
सर्पप्रजाती शरीर वैशिष्ट्यांपासून, खवल्यांच्या रचनेवरून, भौगोलिक विस्तारावरून कशा ओळखाव्यात याची सामान्य व शास्त्रीय माहिती आहे. रेखांकने व छायाचित्रेही आहेत. सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक व सर्पदंशावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांकही आहेत. स्नेकहबची निर्मिती डॉ. दिलीपकुमार व विवेक शर्मा यांनी केरळ व महाराष्ट्रातील सहकाऱ्यांच्या साहाय्याने केली आहे. अमोल लोपेझ हे तांत्रिक सल्लागार असून त्यांनी तांत्रिक रचना व निर्मिती केली आहे. प्राची तानवडे यांनी मराठी भाषांतर केले असून त्यास साहाय्य लक्ष्मीकांत देशपांडे यांनी पुरवले आहे.
---------------
काही रंजक माहिती
- जगातील सर्वात मोठा साप - अजगर तर सर्वात मोठा विषारी साप - किंग कोब्रा दोन्ही भारतात आढळतात.
- भारतीय सापांच्या एकूण ४० टक्के प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत.
- सापांस ऐकू येत नाही.
- सर्वच साप जमिनीवर राहत नाहीत. अनेक जाती समुद्रात सापडतात.