चांद्यापासून बांद्यापर्यंत घरोघरी पत्र पोहोचवा; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 06:39 AM2022-05-29T06:39:58+5:302022-05-29T06:40:03+5:30
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पत्र असेल.
मुंबई : भोंग्यांच्या आंदोलनामागे आपली भूमिका काय होती ती राज्यात घरोघरी पोहोचवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. त्यासाठी राज यांचे एक पत्र उद्यापासून राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे.
भोंग्यांचे आंदोलन आपण का हाती घेतले, या आंदोलनाचे महत्त्व काय आहे, याविषयीची भूमिका राज ठाकरे यांनी या पत्रात मांडली आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे पत्र असेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत घरोघरी हे पत्र पोहोचवा, असे राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले. आपण आतापर्यंत कोणतेही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही, भोंग्यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून अनेक मशिदींवरील भोंगे बंद झाले, असे सांगून ठाकरे म्हणाले की, कोणतेही आंदोलन शेवटापर्यंत नेल्याशिवाय आपण थांबलेलो नाही.
मनसेच्या सदस्य नोंदणीची मोहीम सुरू करणार आहोत. पक्षाचे उपाध्यक्ष व सरचिटणीस राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती देण्यात आली.
प्रवक्त्यांशिवाय कोणीही माध्यमांशी बोलू नका
कोणत्याही विषयावर पक्षाचे प्रवक्ते बोलतील, पक्षातील इतर कोणीही बोलायचे नाही, असा आदेश राज ठाकरे यांनी मेळाव्यात दिले.