हरीश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन शिक्षण संस्था बोगस असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. आपल्या या निर्णयाच्या आधारे या तिन्ही संस्थावर महाराष्ट्र सरकारने योग्य ती कारवाई करावी, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने कळविले आहे. तसे पत्रच आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव, शिक्षण सचिव आणि प्रधान सचिव यांना पाठविले आहे. ही माहिती मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंग यांनी राज्यसभेत दिली.
ज्या तीन शिक्षण संस्थांना बोगस जाहीर करण्यात आले आहे त्यात मुंबईतील दोन तर पुणे येथील एक संस्थेचा समावेश आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव मेडिसिन अॅण्ड नॅचरल हीलिंग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इव्हेंट मॅनेजमेंट या दोन्ही संस्था अंधेरी पश्चिमेला आहेत. दि इंडियन बोर्ड आॅफ हेल्थ एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च, ही संस्था पुण्यामध्ये आहे. यापूर्वीच यूजीसीने नागपूर येथील राजा अरेबिक यूनिव्हर्सिटीला बोगस जाहीर केले होेत. बिहार, दिल्ली, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, ओडिशा, पाँडेचरी अशा ९ राज्यांमधील एकूण २४ विद्यापीठे तसेच शिक्षण संस्था यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस म्हणून जाहीर केले आहे.