स्वच्छतागृहांंची माहिती क्लिकवर
By admin | Published: October 10, 2016 03:52 AM2016-10-10T03:52:03+5:302016-10-10T03:52:03+5:30
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे एका क्लिकवर आता माहिती उपलब्ध होते. हॉटेल, चित्रपटगृहांपासून रुग्णालयांच्या माहितीपर्यंत सगळ्याचा शोध इंटरनेटवर
मुंबई : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे एका क्लिकवर आता माहिती उपलब्ध होते. हॉटेल, चित्रपटगृहांपासून रुग्णालयांच्या माहितीपर्यंत सगळ्याचा शोध इंटरनेटवर लागतो. यापुढे प्रवास करताना नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह जवळपास कुठे आहे, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सध्या यासाठीच्या संकेतस्थळाचे आणि अॅप्लिकेशनचे काम सुरू आहे. ‘राईट टू पी’ (आरटीपी) व आयआयटी मुंबई संयुक्त विद्यमाने हे काम करत आहे.
गेल्या चार वर्षांपासून आरटीपीचे कार्यकर्ते मुंबईत महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सार्वजनिक आणि सुरक्षित मुताऱ्या असाव्यात यासाठी लढा देत आहेत. या चळवळीला काही प्रमाणात यश आले. महिला मुताऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना स्वच्छतागृहांविषयी अनेक प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आरटीपीही हायटेक होत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा रस्त्यांमध्ये स्वच्छतागृह कुठे आहे, याचा शोध घेण्यात बराच वेळ जातो. महिलांना प्रामुख्याने हा प्रश्न सतावत असतो. हा प्रश्न लक्षात घेऊन स्वच्छतागृहांचे अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ तयार करण्यात येत असल्याची माहिती आयआयटी मुंबईच्या लोकसहभाग आणि भौगोलिक माहिती तंत्रज्ञान विभागाचे सीनियर सायटिंस्ट प्रा. जितेंद्र शहा यांनी दिली.
प्रा. शहा यांनी सांगितले, रस्त्याने लांबचा प्रवास करताना नैसर्गिक विधींसाठी स्वच्छतागृह कुठे आहे, या प्रश्नाला उत्तर म्हणून या अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत आहे. पुरुषांसाठी, महिलांसाठी आणि तृतीयपंथियांसाठी स्वच्छतागृहाची सोय कुठे आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अपंग व्यक्तींसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हेदेखील त्यात नमूद आहे. महापालिकेच्या नियमानुसार, तिथे कोणत्या सुविधा आहेत हेदेखील स्पष्ट केले आहे. खिडक्यांची स्थिती, टॉयलेट सीट्स, दारांची स्थिती, कड्या यानुसार गुणांकन दिले आहे. गरजेनुसार, जवळचे किंवा लांबचे स्वच्छतागृह सुविधांनुसार निवडू शकते. सर्वसामान्यांपासून उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचा विचार करून हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. यामध्ये नकाशे देण्यात आले असून, त्या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची अन्य माहिती तिथे क्लिक केल्यावर मिळणार आहे. (प्रतिनिधी)