६ ते ७ वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन् मनातील रोष बोलून दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:22 AM2022-08-10T06:22:56+5:302022-08-10T06:24:04+5:30
अन्य कोणत्याही आमदारांपेक्षा मुंबईतील पाच आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणे हे अत्यंत आव्हानात्मक होते, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री झाले नाही.
- यदु जाेशी
राज्यात ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंगळवारी १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याने एकूण मंत्र्यांची संख्या २० झाली आहे. मात्र विस्तारात शिंदे गटात नंतर आलेल्यांना आधी मंत्रिपद मिळाल्याचा सूर असून भाजपच्या नव्या चेहऱ्यांच्या योजनेलाच खो दिला गेला.
शिवसेनेत बंडाची गुप्त तयारी सुरू झाली तेव्हा आणि प्रत्यक्ष निशाण फडकविले गेले तेव्हाही एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या पहिल्या शिलेदारांवर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अन्याय झाल्याची भावना असून ती दूर करण्याचे आव्हान सप्टेंबरमधील दुसऱ्या विस्तारामध्ये शिंदे यांच्यासमोर असेल. संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने वादळ उठले आहे. अन्य कोणत्याही आमदारांपेक्षा मुंबईतील पाच आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणे हे अत्यंत आव्हानात्मक होते, पण त्यांच्यापैकी कोणीही मंत्री झाले नाही.
संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत पहिल्या दिवसापासून भक्कमपणे सोबत होते, त्यांना बक्षीस मिळाले, पण उशिराने शिंदे गटात सहभागी झालेले दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपद मिळाले. शिंदे गटात जाण्याचा क्रम बघितला तर हे पाचजण ३४ ते ३८ व्या क्रमांकावर होते.
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता, ते वादग्रस्त संजय राठोड यांना पहिल्याच टप्प्यात मंत्री करून शिंदे यांनी काय साधले, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. शिंदे यांनी मदारांची शपथविधीपूर्वी बैठक घेतली. तीत कोणीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नाही, पण सहा ते सात वजनदार आमदार शिंदे यांना वैयक्तिकरीत्या भेटले आणि त्यांनी मनातील रोष बोलून दाखवला, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
भाजपचे मंत्री सोमवारी रात्रीच ठरले. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री जेवणही दिले. शिंदे यांची मात्र मंत्री निश्चित करताना कसरत दिसून आली. राठोड यांना सुरुवातीला मंत्री करू नका, विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर संधी द्या, असा आग्रह भाजपने धरला होता. पण, तो फेटाळण्यात आला. राठोड हे शिंदेंचे निष्ठावंत मानले जातात. बंड घडवून आणण्यात कळीची भूमिका असलेले बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल आणि महेश शिंदे यांच्यापैकी कोणालाही संधी मिळाली नाही. ‘मातोश्री’शिवाय आपण कसे जगणार असे मानणाऱ्या आणि भाजपला प्रचंड विरोध असणाऱ्या आमदारांची मने वळविण्याचे काम शिंदेंच्या सोबतीने या पाचजणांनी केले.