पु. ल. देशपांडे अकादमीत मिळणार कलाकारांची माहिती, मोठा डेटाबेस तयार होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:57 PM2023-10-05T18:57:49+5:302023-10-05T18:58:07+5:30
कोरोनाच्या काळामध्ये कलाकारांबाबतची माहिती उपलब्ध नसल्याने गरजू कलावांतांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्यात अडचण आली होती.
मुंबई - पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील लहान-मोठ्या कलाकारांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अकादमीकडे कलाकारांचा खूप मोठा डेटाबेस तयार होणार आहे.
कोरोनाच्या काळामध्ये कलाकारांबाबतची माहिती उपलब्ध नसल्याने गरजू कलावांतांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्यात अडचण आली होती. याखेरीज बऱ्याचदा होणाऱ्या शासनाच्या कार्यक्रमांसाठीही कलाकारांची माहिती उपलब्ध नसते. अनेक कलाकारांचा डेटाबेस नसल्याची खंत वरिष्ठ कलाकारांनी व्यक्त केली होती. भविष्यात ही उणीव भासू नये यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत कलाकारांची माहिती गोळा करण्यात येत आहे.
यासाठी एक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून कलाकारांनी अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळाला भेट देऊन artist Repository (कलाकार भांडार)या टॅबवर क्लिक करून माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा डेटाबेस अकादमीकडे कायमस्वरूपी राहणार आहे. ज्यांना असा डेटाबेस हवा असेल त्यांनी अकादमीशी ईमेल द्वारे संपर्क साधण्यास तो उपलब्ध होऊ शकेल. हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री आणि प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती प्रकल्प संचालक, संतोष रोकडे यांनी दिली आहे.
याबाबत 'लोकमत'शी बोलताना रोकडे म्हणाले की, मध्यंतरी काही घटना घडल्या ज्यावेळी कलाकारांना मदत करण्याची इच्छा असूनही त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. विशेषत: वरिष्ठ कलाकारांना सरकारच्या मदतीची नितांत गरज असते. त्याच जाणिवेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून यावर काम सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून माहिती भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी चित्रपट, कला आणि नाट्यक्षेत्राशी निगडीत असलेल्या संस्थांशीही संपर्क साधण्यात आल्याचे रोकडे यांनी सांगितले.