पुढील स्टेशन... आग्रा रोड !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:31 AM2023-12-25T10:31:28+5:302023-12-25T10:33:03+5:30
मध्य, पश्चिम आणि हार्बर हे तीनच रेल्वेमार्ग मुंबईकरांना माहीत आहेत.
संजीव साबडे, मुक्त पत्रकार -
मध्य, पश्चिम आणि हार्बर हे तीनच रेल्वेमार्ग मुंबईकरांना माहीत आहेत. मात्र, ब्रिटिशांच्या काळात शहरात ट्रॉम्बे ते सहार असा एका छोटेखानी रेल्वेचा प्रयोग झाला होता. मात्र, विमानतळामुळे तो मार्ग बंद करावा लागला...
सांताक्रुझ-कालिनापासून कुर्ल्याला जाणाऱ्या रस्त्याला जुनी मंडळी सीएसटी रोड म्हणतात. कुर्ला-सांताक्रुज टर्मिनसवरून हे नावे आलं असं म्हटलं जातं. पण तसं टर्मिनसच नाही वा नव्हतं तिथं. सीएसटी या नावाचा उलगडाच होत नाही. अनेकांना माहीत नसेल की त्या रस्त्याने पूर्वी रेल्वे धावत होती आणि तिचं नाव होत सेंट्रल साल्सेट ट्रामवे (सीएसटी).
ही ट्रॉम्बे ते सुरू होऊन अंधेरीच्या सहारपर्यंत धावायची. त्या रेल्वे स्टेशन्स वा मार्गाच्या खुणाही कुठे सापडत नाहीत. या मार्गावर आग्रा रोड नावाचं स्टेशनही होतं. ती रेल्वे आज सुरू असती, तर “पुढील स्टेशन आग्रा रोड” असं मुंबईतही ऐकू आलं असतं. ट्रॉम्बेहून निघणारी ही ट्रेन वडवली व माहुल रोड या (आजच्या चेंबूर भागातील, कासार वडवली नव्हे) स्टेशनमार्गे कुर्ला जंक्शनवर यायची. तिथून आग्रा रोड रेल्वे स्टेशनवर.
कुर्ल्याहून सुरू होणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा जुना आग्रा रोड या नावाने ओळखला जातो. त्यामुळे कुर्ल्यानंतरच्या स्टेशनला आग्रा रोड नाव दिलं गेलं. तिथून ही ट्रेन पश्चिम उपनगरांत येई. सांताक्रूझच्या कोलीवेरी (कोळीवाड्याचा अपभ्रंश) व कोळे कल्याण (आत्ताचं कालिना) ही दोन पुढील रेल्वे स्टेशन होती. ही दोन्ही स्टेशन्स आजच्या कालिना भागात होती. तिथून ट्रेन आधी थेट अंधेरीच्या सहारला येई. पुढील चकाला रेल्वे स्टेशनवर तिचा प्रवास संपे. मग ती पुन्हा ट्रॉम्बेकडे जायला निघे. सेंट्रल साल्सेट ट्रामवेचं दुसरं नाव ट्रॉम्बे सालसेट रेल्वे असंही होतं.
पश्चिम उपनगरातील लोक सुटीच्या दिवशी या ट्रेनने ट्रॉम्बेला जात आणि तिथे मुबलक प्रमाणात मिळणारी ताडी व माडी पीत, असे उल्लेख सापडतात. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारी ही रेल्वे फार काळ चालली मात्र नाही. ती सुरू झाली १९२८ साली आणि बंद झाली १९३४ मध्ये. म्हणजे अवघ्या सहा वर्षांत तिने गाशा गुंडाळला. ती बंद होण्याचं एकमेव कारण सांताक्रूझ विमानतळ. मुंबईत विमानतळ उभारण्याचा निर्णय झाल्यावर शहरापासून दूर म्हणजे पश्चिम उपनगरात जागा शोधणं सुरू झालं.
कालिना, सांताक्रूझपासून सहारपर्यंतचा पट्टा विमानतळासाठी योग्य असल्याचं लक्षात आलं. अडचण एकच होती. तेथून रेल्वे जात होती. विमानतळासाठी दुसरी योग्य मोकळी जागा नसल्याने सेंट्रल सालसेट ट्रामवे बंद करणं क्रमप्राप्त होतं. त्यानुसार ती बंद झाली. तिथं लगेच विमानतळाचं कम सुरू झालं आणि १९४१ साली तिथून मुंबईतलं पहिलं विमानं उड्डाण झालं.