मुंबई - असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना पंतप्रधान श्रम योगी मानधन पेंशन योजनेव्दारे (पीएमएसवायएम) अर्थसहाय्य मिळू शकते. मात्र, मोलकरणी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स या कर्मचा-यांची माहिती आॅनलाईन पध्दतीने मिळविणे सरकारला अवघड जात आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या हद्दित कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची माहिती कळवावी असे आवाहन राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
पीएमएसवायएम योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेंशन देण्याची घोषणा सरकारने यापुर्वीच केलेली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातले आणि मासिक १५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचा-यांना या योजनेचा लाभ घेता येईल. वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर त्यांना पेंशन लागू होणार आहे. परंतु, या योजनेसाठी पात्र ठरणारे बहुतांश कर्मचारी हे अशिक्षित असून त्यांना या योजनेची पुरेशी माहिती नाही. आॅनलाईन अर्ज करण्याबाबत ते अनभिज्ञ आहेत. कोरोनाच्या संकटानंतर यापैकी अनेकांवर आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या कर्मचा-यांना भविष्यात त्यातून अर्थसहाय्य मिळू शकते. त्यामुळे या योजनेची व्याप्त वाढविण्यासाठी आता सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातू या लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांमधि सदस्यांनी आपल्याकडे कार्यरत असलेल्या किंवा परिचीत असलेल्या या कर्मचा-यांची माहिती आॅनलाईन भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत साधा अर्ज असून त्यात कर्मचा-याचे नाव, त्याचे लिंग, जन्म तारिख, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, कामाचे स्वरुप, सध्या कार्यरत आहे की नाही, महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण संघटनेचा सदस्य आहे किंवा नाही, रेशनिंग कार्ड, त्याचा प्रकार, गृहनिर्माण संस्थेचे नाव आणि पत्ता, रजिस्ट्रेशन क्रमांक, शहर आणि पिनकोड क्रमांक अशी माहिती या अर्जात भरायची आहे. ६ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.