१. मुंबई किनारा रस्ता - २० टक्के काम पूर्ण झाले. मुंबईच्या पश्चिम उपनरातून थेट दक्षिण मुंबई गाठण्यासह दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहतुकीचा वेग वाढवा, वाहन चालकांचा वेळ वाचवा, इंधनाची बचत व्हावी, प्रदूषण कमी व्हावे, थोडक्यात भविष्यातील मुंबई सुपर फास्ट व्हावी, याकरिता मुंबई महापालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम आजघडीला २० टक्के पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै, २०२३ उजाडणार आहे.
२. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ३५ टक्के काम पूर्ण - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम आज घडीला ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. २०१८ साली सुरू झालेले हे काम सप्टेंबर, २०२२ साली पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मार्ग नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे महामार्गाला जोडला जाणार आहे. एमटीएचएल, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, विरार अलिबाग कॉरिडोर, मीरा-भाईंदर कोस्टल रोड या प्रकल्पांद्वारे येत्या दहा वर्षांत महानगर क्षेत्रात रिंगरूट तयार होणार असून, यावरून विनासिग्नल प्रवास करता येईल.
३. म्हाडाच्या लॉटरीत २ हजार ५०० घरे - गोरेगाव लिंक रोड येथे १८ एकर भूखंडावर म्हाडाकडून ४ हजार ५०० घरांचे बांधकाम सुरू असून, यातील २ हजार ५०० घरे म्हाडाच्या लॉटरीत असण्याची शक्यता आहे. मात्र, ही सगळी प्रक्रिया अगदीच प्राथमिक स्तरावर आहे. गोरेगाव येथील २ हजार ५०० घरांसह इतर ठिकाणांवरील घरेही म्हाडाच्या लॉटरीत असण्याची शक्यता आहे. मात्र, ही घरे नेमकी कुठे आणि किती असतील? याबाबत म्हाडाने काहीच जाहीर केलेले नाही.
४. वीजपुरवठा खंडित - १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या चार वाहिन्यांपैकी ४०० के.व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली. ४०० के.व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. सकाळी १० वाजून १ मिनिटांनी ४०० के.व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. वीजपुरवठा बाधित झाला.
५. हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला - महापालिकेने वायू वैविध्य सर्वेक्षण, संशोधन प्रयोगशाळेमार्फत तयार केलेला वायुप्रदूषण पातळीचा अहवाल जारी केला. अहवालानुसार हवा समाधानकारक नोंदविण्यात आली. चेंबूर, भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी, बोरीवली येथे धूलिकणांचे प्रमाण १५० पार्टीक्युलेट मॅटरच्या आसपास होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे प्रमाण ५० पार्टीक्युलेट मॅटर एवढे खाली घसरले. याचाच अर्थ, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला होता, तर दुसरीकडे गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतलच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली. १९८८ मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते. जे २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले. ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे. कवच नष्ट झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे.