Join us

मुंबईच्या विकासाच्या गतीप्रमाणे पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. त्याच गतीने पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागेल, अन्यथा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. त्याच गतीने पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागेल, अन्यथा वाहतूक कोंडीसारख्या समस्या भेडसावत राहतील. त्यासाठी महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सक्षम असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहत आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आधी येथे चौफेर पसरलेली खाडी होती. रस्ते किंवा अन्य पायाभूत सुविधा नव्हत्या. सुरुवातीला कलानगर आणि त्यापाठोपाठ धारावीचा रस्ता झाला. पाहता पाहता वस्ती वाढली. जिथे कधीतरी गाडी दियाची तिथे वाहतूक कोंडी व्हायला लागली. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने कलानगर जंक्शन आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.

मुंबईतील रहदारी दिवसागणिक वाढत आहे. रस्ते अपुरे पडत असल्याने रस्त्यावर रस्ते, रस्त्याच्या खालून रस्ते उभारले जात आहेत. परंतु, असे किती मजली रस्ते आपण करू शकू, हाही एक मोठा प्रश्न आहे. एमएमआरडीएचे कार्यालय माझ्या घराच्या बाजूला असल्याचा फायदा झाला, कलानगरमधील वाहतूक समस्या मिटली. त्यामुळे जिथे जिथे वाहतूक कोंडी होते, तिथे एमएमआरडीएचे कार्यालय उभारण्यास हरकत नाही, असे मुख्यमंत्री यावेळी गमतीने म्हणाले.

या कार्यक्रमाला नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते.

* असा असेल मार्ग...

- कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी मार्ग/एस. व्ही मार्ग, सायन/धारावी रस्ता, वांद्रे-कुर्ला संकुल जोड रस्त्यासह इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

- वाहतुकीच्या वेळेत साधारण दहा मिनिटे बचत होणार आहे. या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८,०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून वांद्रे वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे.

- या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. सोमवारी वांद्रे वरळी सागरी मार्ग ते वांद्रे-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

* दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी !

कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे सांगितले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण सोमवारी मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेड्स रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही.

--------------------------------------------