Join us

मुंबईत उभारणार पायाभूत सुविधांचे जाळे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 8:02 AM

मुंबईत सार्वजनिक उपक्रम, विशेष हेतू कंपन्या, महापालिका यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प कालबद्धरीत्या पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम प्रगतिपथावर असून, त्याचा विस्तार पालघरपर्यंत करण्यात येईल तसेच मुंबईतील  विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग ठाणे शहरापर्यंत नेला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचे कामही पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत सार्वजनिक उपक्रम, विशेष हेतू कंपन्या, महापालिका यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प कालबद्धरीत्या पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. भारतातील सर्वाधिक, २२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग, अटलबिहारी महानगर वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन क्षेत्रातील ड्राइव्हपर्यंत किनारी मार्गाला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट ते वरळी या ११ किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ७० टक्के आणि इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सागरमाला योजनेंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीचे, २२९ कोटी २७ लाख रुपये किमतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशात उभारावयाच्या ३३७ किलोमीटर लांबीपैकी २६३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका मंजूर असून, ४६.५ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर मेट्रोचा प्रवास सुरू झाला आहे. या मार्गावर सुमारे सहा लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत.  नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू असून, त्याचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत सुरू होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

प्रशिक्षण व कौशल्य विकास भवनवरळी येथे अत्याधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन तसेच  वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवनाची इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, तर मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे कामही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

टॅग्स :अजित पवार