मुंबई : नुकताच वाहतूककोंडीबाबत ‘टॉमटॉम’ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जगभरात वाहतूककोंडीत बंगळुरू अव्वल, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. पायाभूत सुविधांच्या कामामुळे मुंबईची गती मंदावली असून, वाहतूककोंडीस मेट्रो, ड्रेनेज, पूल दुरुस्तीची कामे कारणीभूत आहेत, असे मत मुंबई वाहतूक पोलिसांचे सल्लागार डॉ. शंकर विश्वनाथ यांनी व्यक्त केले आहे.टॉमटॉम या कंपनीने सहा खंडांतील ५७ देशांत ४१६ शहरांत पाहणी करून वार्षिक वाहतूक निर्देशांक जारी केला. कंपनीचे हे नववे वर्ष असून, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स जगात शहरी भागांत वाहतुकीची कोंडी नेमकी कोणत्या वेळी होते व वाहतूककोंडीचा इतिहास उपलब्ध करून दिला आहे. याबाबत डॉ. शंकर विश्वनाथ म्हणाले, मुंबईत पायाभूत सुविधाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये मुंबईत विविध ठिकाणी ९ मेट्रोची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्हावा यासाठीटॉम वॉटर ड्रेनचे पाइप टाकण्यातयेत आहेत. यासाठी परळ, लालबाग, हिंदमाता आदी ठिकाणी एकमार्गिका बंद करून ही कामे करण्यात येत आहेत. मेट्रोच्या कामासाठीएक आणि टॉम वॉटरच्या कामासाठी एक अशा एकूण दोन मार्गिका कामामुळे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची गतीमंदावली आहे, असेही विश्वनाथ यांनी सांगितले.रस्तेनिर्मितीवर बंधन; वाहनांची संख्येत वाढ- मुंबईला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे. आपण नवीन रस्ते बनवू शकत नाही. मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच दोन्ही बाजूंना इमारती असल्याने रस्ता वाढवू शकत नाही. तर आहे त्या रस्त्यात सहा मार्गिकांमधील दोन बंद झाल्यामुळे चार मार्गिकांवर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक मंदावते. त्यामुळे सगळीकडे वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात येते. त्यामुळे त्याही मार्गावर वाहतुकीचा ताण पडतो, असे ते म्हणाले.- मुंबईत अनेक उड्डाणपूल बंद करण्यात आले आहेत. सायनचा पूल दुरुस्ती करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी उड्डाणपुलाची एक मार्गिका वापरतो. पण जर आॅडिटमध्ये धोकादायक ठरविण्यात आला असेल तर तो बंद करावा लागतो, त्याचाही वाहतुकीवर परिणाम होतो, असेही ते म्हणाले.काय सांगतो अहवाल!अहवालानुसार मुंबईतील वाहतूककोंडी ६५ टक्के आहे. सरासरी, मुंबईकर पीक अवर्समध्ये २०९ तास म्हणजे वर्षाला ८ दिवस, १७ तास इतका अतिरिक्त वेळ वाहतूककोंडीत घालवतात. मुंबईतील सर्वाधिक कोंडी (१०१ टक्के) ९ सप्टेंबर २००९ रोजी तर सर्वांत कमी वाहतूककोंडी (१९ टक्के) २१ मार्च २०१९ रोजी होती.
पायाभूत सुविधांच्या कामांनी मुंबईतील वाहतूक मंदावली; जगभरात वाहतूककोंडीत मुंबई चौथ्या स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:21 AM