लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही महिन्यात मुंबईची हवा इतकी प्रदूषित झाली आहे की मुंबईकरांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण अतोनात वाढले असून श्वास घेतला की धुळीचे कण नाकावाटे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. परिणामी घरोघरी सर्दी, खोकल्याचा रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक आणि लहान मुले हैराण झाली आहेत. दम लागणे, खोकला, ताप, घसा खवखवणे आणि डोळ्यांची जळजळ किंवा थकवा यासारख्या तक्रारी आढळून येत आहेत. या खराब हवामानामुळे एकूणच श्वासविकारच्या व्याधीची लक्षणे सध्या नागरिकांमध्ये आढळून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेताना अडथळे निर्माण होत आहेत. हा त्रास काही दिवस राहिल्यास खोकून घसा लाल होतो. त्यामुळे या आजारावरील उपचारांकरिता डॉक्टरकडे जावे लागते. काही जणांना याचा त्रास अधिक जाणवून ताप येत असतो. सुरुवातीच्या काळात वाटणारा खोकला आणि सर्दी ही सर्वसामान्य लक्षणे वाटत असली तरी त्याच्यावर वेळीच उपचार नाही केल्यास तो त्रास वाढत असल्याचे दिसून आले आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे, विशेष करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्वसन विकाराशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण असल्यामुळे श्वसनमार्गाच्या खालच्या आणि वरच्या भागात संसर्ग होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये ताप, खोकला, दमा, अस्थमा, ॲलर्जी आणि न्यूमोनियाच्या व्याधी दिसून येतात. फुप्फुसाच्या कार्यात अडथळा आणणारा आजार ज्याला आम्ही (सीओपीडी) असा आजार म्हणतो. तो होण्याची शक्यताही असते. त्यामुळे ज्यांना श्वसन विकार आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे.- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल
सततच्या बांधकामांमुळे हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. त्यामुळे श्वासोच्छ्वासास त्रास, खोकला, घरघर, सर्दी, ताप, नाक वाहणे, छातीत जड होणे, घसा खवखवणे, नाक चोंदणे, डोळे जळजळणे यासारख्या तक्रारी घेऊन लहान मुले दररोज ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. आता ही संख्या दिवसाला ६० ते ७० वर पोहोचली आहे. श्वासोच्छ्वासाच्या आजारांचा वैद्यकीय इतिहास असलेल्या मुलांमध्ये ही लक्षणे अधिक असल्याचे दिसून येते, मुलाच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी वेळीच निदान व योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.- डॉ. परमार्थ चंदणे, बालरोग श्वसन विभागप्रमुख, वाडिया हॉस्पिटल