अमानुष गुन्ह्यांचा जातपंचायतींना विळखा!
By Admin | Published: March 23, 2015 02:04 AM2015-03-23T02:04:20+5:302015-03-23T02:04:20+5:30
राज्यात अनेक जातपंचायती आणि गावकी यांच्या संदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.
मुंबई : राज्यात अनेक जातपंचायती आणि गावकी यांच्या संदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. समाजातील लोकांमधील वाद मिटविण्याच्या नावाखाली जातपंचायतींकडून अनेक प्रकारची दुष्कृत्ये सर्रासपणे केली जात आहे. अंनिसने शासनाकडे सादर केलेल्या मसुद्यातून हे वास्तव समोर आले आहे.
जातपंचायती या समांतर वाद निवारण पद्धती किंवा न्यायदान पद्धतीप्रमाणे कार्यशक्ती वापरत असल्याचे दिसून येते. जातपंचायतीत जन्मापासून ते मृत्यूनंतरचे विविध कार्यक्रम पंचाच्या उपस्थितीत करण्याची जबरदस्ती करणे, प्रेताला खांदा देण्यापासून इतरांना रोखणे, प्रेताला दंड करणे, समाजातील व्यक्तींनी प्रथा, परंपरा, रितीरिवाज मोडले असे सांगून आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक करणे, जनावरांना एकत्र चरण्यास अथवा पाणी पिण्यास बंदी घालणे, जातीत परत घेण्यासाठी अनिष्ट, अघोरी प्रथांचा अवलंब करण्याची जबरदस्ती करणे अशा एकापेक्षा एक गंभीर प्रथांच्या विळख्यात राज्यभरातील जातपंचायती अडकल्या आहेत.
याशिवाय, न्यायव्यवस्थेतील स्त्रियांविषयीचा अनादर या प्रथांमधून उघडकीस आला आहे. गर्भवती असताना लग्न लावणे, लग्न ग्राह्य धरण्यासाठी मुलीने कौमार्याची परीक्षा देण्याची जबरदस्ती करणे, महिलेला पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालण्याची जबरदस्ती करणे, झाडाची पाने हातावर ठेवून त्यावर तप्त केलेली कुऱ्हाड ठेवणे, पाण्याची घागर डोक्यावर ठेवून एका दमात डोंगर चढणे अशा अघोरी शिक्षा व प्रथांना जातपंचायतीतील स्त्रिया सामोऱ्या जात आहेत. (प्रतिनिधी)
कायदा लवकर आणावा
जातपंचायतविरोधी कायदा तयार करण्यासाठी नुकताच अंनिसने शासनासमोर मसुदा सादर केला. या मसुद्याच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या सहभागाने हा कायदा लवकरात लवकर आणावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.