मुंबई - शिवसेनेच्या मुंबईतील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या शीतल म्हात्रे या काल अचानक शिंदे गटात दाखल झाल्या. शीतल म्हात्रेंनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, निष्ठा यात्रेनंतरच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. आता खुद्द शीतल म्हात्रे यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या बदललेल्या भूमिकेबाबत शीतल म्हात्रे म्हणाल्या की, हे मतपरिवर्तन अचानक झालेलं नाही. शिवसैनिक भावनाप्रधान असतो. त्यामुळेच बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला आम्हालाही धक्का बसला. सर्वसामान्य शिवसैनिकांप्रमाणेच आम्हालाही वाईट वाटलं. मात्र हे कसं झालं आणि का झालं याबाबत बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका ऐकली तेव्हा ही भूमिका प्रत्येक नगरसेवक प्रत्येक शिवसैनिकाची आहे, असं आम्हाला वाटलं. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आज सर्वस्व पणाला लावून हे लोक काम करत असतील तर त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांच्या बरोबरीने खारीचा वाटा उचलावा, असं आम्हाला वाटलं म्हणून मी आज शिंदे गटात सहभागी झाले आहे.
गेली पाच वर्षे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. मात्र नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरू होती. काही मुठभर लोकांच्या ताब्यात ही महानगरपालिका गेली होती. साहेबांना, मातोश्रीवर हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या नाहीत. पण त्यांच्यापर्यंत आमची भूमिका पोहोचवली नाही, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.
आज मी जे काही बोलतेय ती महानगरपालिकेतील प्रत्येक नगरसेवकाची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळात हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. आज मी आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, अगदी मी नगरसेविकाही नाही आहे. मी माजी नगरसेविका आहे. मला ईडी नाही आहे, काही नाही आहे, मला बॉक्सही मिळालेला नाही. फक्त हिंदुत्वाचे विचार पटलेत म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवधनुष्य पेलणारी ही आपल मंडळी दिसली म्हणून मी त्यांच्यासोबत आले आहे, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी रात्री शीतल म्हात्रे यांनी काही कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.