ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर
मुंबई, दि. 3 - दिंडोशीच्या नागरी निवारा समोरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरातून वाहणाऱ्या वलभट नदीची गटारगंगा झाली असून याबाबत जनजागृती करण्यासाठी रिव्हर मार्च या संस्थेने पुढाकार घेतला आहे. गोकुळधाम मार्गे वाहणारी वलभट नदी हा ओशिवरा नदीचा एक मुख्य स्तोत्र असून येथील डोंगरात चालू असलेले अविरत उत्खनन, वृक्षतोड, वणवे, व नागरी वस्तीतून होणारा सांडपाण्याचा निचरा यामुळे नदीला अक्षरशः गटारावस्था प्राप्त झाली असून यादृष्टीने काही ठोस पाऊले उचलण्यासाठी गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परिषद येथे रिव्हर मार्चच्या सभासदांनी एक बैठक आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी या प्रश्नाला संसदेत वाचा फोडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा विषय चर्चिला गेल्याने रिव्हर-मार्च या चळवळीला एक वैधानिक अधिष्ठान मिळाले याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक लोकप्रतिनिधींना या चळवळीला जोडून घेणे, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घेणे, वलभट नदीच्या पृष्ठभागावर केल्या जाणाऱ्या काँक्रिटीकरणाबद्दल अधिक माहिती घेऊन त्याचे दूरगामी परिणाम अभ्यासणे, दिंडोशी डोंगरात लावण्यात येणाऱ्या आगी व केली जाणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी कोणते सनदशीर मार्ग अवलंबिता येतील याचा अभ्यास करणे, नदीच्या पात्राचे नकाशे मिळवणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. साद-प्रतिसाद संस्थेचे सचिव संदीप सावंत,संजय प्रिंदावणकर,शरद मराठे तसेच नागरी निवारा व न्यू म्हाडा वसाहतीं मधील नागरिक या सभेस उपस्थित होते.रिव्हर-मार्च चळवळीचे अतुल वैद्य यांनी सर्वाना मार्गदर्शन केले.
पश्चिम उपनगरातून वाहणाऱ्या दहिसर, पोईसर, ओशिवरा व मिठी या नद्या या शहराच्या इकोसिस्टमचा एक अविभाज्य भाग. दुर्दैवाने गेल्या काही दशकात या नद्या अशा काही दुरावस्थेला पोचल्या आहेत की बहुसंख्य मुंबईकरांना त्यांचे अस्तित्वच माहीत नाही. माप जंगलतोड, वणवे, झोपडपट्या, खारफुटीची कत्तल, अनधिकृत बांधकामे, सांडपाणी/कचरा/औद्योगिक/रासायनिक वस्तूंचे डम्पिंग यांनी या नद्यांचा अक्षरश: गळाच घोटला आहे. या नद्या व त्यांच्या आधारावर वाढणारे,वृक्ष, वेली, पशु, पक्षी या सर्वांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. इतकेच नाही तर प्रदूषित पाणी समुद्रात मिळाल्याने मत्स्यजीवन देखील धोक्यात आले आहे. मुंबईकर या नद्यांना विसरला असला तरी नद्या मात्र स्वतःचे अस्तित्व विसरल्या नाहीत.
एखादा २६ जुलै येतो आणि मिठीच्या मगरमीठीने आपले डोळे खाडकन उघडतात. मग सगळ्या यंत्रणा जागृत होऊन काहीशे करोड रुपयांची तजवीज केली जाते.मग पुन्हा सारे काही शांत निवांत. एखादा नवीन २६ जुलै येईपर्यंत निसर्गाची हानी चालूच आहे.असे अनर्थ पुन्हा घडू नयेत यासाठी रिव्हर-मार्च या संघटनेने पुढाकार घेतला आहे. राजेंद्र सिंहजी यांच्या प्रेरणेने ही चळवळ उभी राहिली असून मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीवन हा एकच ध्यास मनात ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. गेल्या ४ व ५ मार्च रोजी पोईसर व ओशिवरा नद्यांच्या किनाऱ्याने काढण्यात आलेल्या परिक्रमांनी लोकांमध्ये विशेषतः शाळकरी मुलांमध्ये या समस्येविषयी कमालीची जागृतता निर्माण झाली, अशी माहिती अतुल वैद्य यांनी दिली.