मुंबई - स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेला ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासीयांच्या मनांना जोडणारा उपक्रम आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी केले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशभरातील अनेक महापुरुषांनी बलिदान दिले आहे. यात स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील महापुरुषांचेही योगदान आहे. देशाचा इतिहास आणि महापुरुषांच्या बलिदानाचे स्मरण करून आदर्श भारत आणि महाराष्ट्र निर्माण करूया. जगभरातील देशात नाहीत तेवढे किल्ले महाराष्ट्रात आहेत. हा ऐतिहासिक ठेवा असून, त्याचे सर्वांना स्मरण असले पाहिजे. युवा पिढीने याचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कोश्यारी यांनी केले.
तर, ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात महाराष्ट्राला अव्वल आणू, यातील उपक्रम महाराष्ट्रात दिमाखाने साजरे होतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या सोहळ्यात व्यक्त केला. अशा उपक्रम कार्यक्रमांसाठी निधीची कमतरता येणार नाही, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरव विजय, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.