लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवस-रात्र मेहनत करून आपल्या घरचा चरितार्थ चालविणाऱ्या छोटया व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
छोटे व्यापारी तसेच स्टॉलधारकांना दैनंदिन जीवनात व्यापार करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचावे, यासाठी आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आता हळूहळू ते पूर्ववत होत आहेत तर काहीजणांचे व्यापार अजूनही सुरू नाहीत, अशा परिस्थितीत तोटा सहन करूनही त्यांनी कामगार वर्ग जपला. त्यामुळे पालिकेकडून आकरण्यात येणारे कर व शुल्क एक वर्षासाठी माफ करावे.
एमएमआरडीए क्षेत्रात तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये विकासकामांच्या प्रकल्पामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना व दुकानदारांना त्रास व आर्थिक नुकसान सहन कराो लागते. अशावेळेस काम पूर्ण होईपर्यंत त्यांना मोबदला मिळाला तर आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होऊ शकेल.
दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसावा यासाठी बसथांब्याच्या मागील भाग जाहिरातींसाठी देऊ नये तसेच स्टॉलधारकांना त्यांच्या नावे परवाने द्यावेत, अशा विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे. याबाबत आम्ही योग्य तोडगा काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
--------------------------------------------