महसूल यंत्रणा अद्ययावत करण्यावर पुढाकार !
By admin | Published: August 2, 2014 12:45 AM2014-08-02T00:45:45+5:302014-08-02T00:45:45+5:30
मुरुड तहसील कार्यालयात ‘ई फेरफार कक्ष’ याचे उद्घाटन फीत कापून त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
मुरुड : महसूल खाते हे सामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे खाते म्हणजे लोकांचे नाक, कान व डोळे आहेत. या खात्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, महसूल इष्टांक, निवडणुकीची सर्व कामे, लोकांना जमिनीच्या मालकीचा सातबारा आदी महत्त्वाची कामे केली जातात. प्रत्येक कामात पारदर्शकता रहावी व सामान्य जनतेचे काम त्वरित होण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल यंत्रणा अद्ययावत करण्यावर जास्त पुढाकार घेवून प्रत्यक्षरीत्या संगणकीय प्रणालीचा उपयोग करुन ‘ई - फेरफार’ व ‘ई-अभिलेख’ या सारखे उपक्रम राबवून सामान्य जनतेचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले.
मुरुड तहसील कार्यालयात ‘ई फेरफार कक्ष’ याचे उद्घाटन फीत कापून त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, तहसीलदार अजय पाटणे, तालुका समन्वय समिती अध्यक्ष मंगेश दांडेकर, एन.एल. आर. पी.चे अधिकारी मिश्रा, भरत बेलोसे, अतिक खतीण, नगराध्यक्ष रहिम कबले, सभापती रमेश नागावकर, पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर, प्रमोद भायदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी भांगे म्हणाले, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात ई प्रणालीचा वापर होणार आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्याचीच निवड करण्यात आली आहे. आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यास सातबारा व फेरफार नोंद पहाता येते. महसूल खात्याचे जुने रेकॉर्ड ‘ई अभिलेख’ द्वारे जतन केले जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यात १७५ कॅम्प घेवून ५० हजार दाखल्यांचे विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत. प्रसार माध्यमे हे महसूल खात्याच्या प्रत्येक उपक्रमास सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, ही सेवा ८ ते १० दिवसात यशस्वीपणे कार्यरत होणार असल्याचे सांगितले. शासनाचा हा क्रांतिकारी निर्णय असून लोकांना ही सेवा जलद मिळणार आहे. या कार्यक्रमात आदिवासीन्ाां शिधापत्रिका तर शालेय विद्यार्थ्यांना अधिवास दाखल्याचे वाटप करण्यात आले. महसूल इष्टांक पूर्ण करणारे तलाठी नांदगाव मंगेश इंंग्रलकर व बोर्लीचे तलाठी के. पी. दिवकर यांना शाल, श्रीफळ देवून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग आरेकर तर आभार तहसीलदार अजय पाटणे यांनी केले. (वार्ताहर)