इंजेक्शनच्या रिअॅक्शनने तरुण दगावला
By admin | Published: December 27, 2015 12:23 AM2015-12-27T00:23:34+5:302015-12-27T00:24:37+5:30
देवगडमधील घटना : दोघे गंभीर; ग्रामस्थांचा रास्ता रोको; डॉक्टरवर निलंबनाची कारवाई
देवगड : जामसंडे-कावलेवाडी येथील संदीप कावले (वय ४१) यांना ग्रामीण रुग्णालयात अंगदुखीवरचे इंजेक्शन दिल्यानंतर आलेल्या रिअॅक्शनमध्ये त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. तसेच इंजेक्शनच्या रिअॅक्शनमध्ये अन्य दोन रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाल्यामुळे संतप्त देवगड व जामसंडे-कावलेवाडी ग्रामस्थांनी देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर दोन तास रास्ता रोको करून ग्रामीण रुग्णालयाला घेराव घातला. त्यामुळे देवगड परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, मृताच्या पत्नीस आरोग्य खात्यात नोकरी देऊन डॉ. अमरीश आगाशे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई झाल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कावलेवाडी येथील संदीप कावले हे ग्रामीण रुग्णालयामध्ये आपले अंग दुखत असल्याने उपचारासाठी गेले होते. त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीश आगाशे यांनी अंगदुखीवरचे इंजेक्शन दिले. त्यानंतर संदीप कावले हे रिक्षा व्यावसायिक असल्याने ते रिक्षा चालवत घरी गेले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
नारायण हरी वागट (४२, रा. मिठमुंबरी) व गुणाबाई बाजीराव जाधव (६९, रा. तळेबाजार) या रुग्णांनाही डॉ. अमरीश आगाशे यांनी अंगदुखीवरचे इंजेक्शन दिले होते. त्यांनाही इंजेक्शन दिल्यानंतर त्याची रिअॅक्शन होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र, त्यांना देवगड खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे आश्वासन
ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिलोलीकर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास देवगडमध्ये दाखल झाले. डॉ. बिलोलीकर यांनी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आदेशानुसार डॉ. अमरीश आगाशे यांना तत्काळ निलंबित केले व मृताच्या पत्नीला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आरोग्य विभागामध्ये नोकरी देण्याचे सांगितले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मृताच्या पत्नीला नुकसानभरपाई निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संदीप कावले यांचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
नाईक, राऊतांकडून लाखांची मदत
ही घटना घडल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक दुपारी देवगडमध्ये आले होते. खासदार राऊत आणि आमदार नाईक यांच्याकडून वैयक्तिकरत्ीया एक लाख रुपयांची मदत मृताच्या पत्नीला देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मृताच्या पत्नीला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा $$्आिरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र असून, त्यांच्याच तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले कित्येक महिने डॉक्टरांची पदे रिक्त आहे. आरोग्यमंत्र्यांना आपल्याच तालुक्यातील रुग्णालयांमध्ये सुविधा देता येत नसतील, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते महाराष्ट्रातील जनतेला कशा पद्धतीने सुविधा देऊ शकतात, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात होता. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
ग्रामस्थ आक्रमक : मागण्यांवर ठाम
४तरुणाचा झालेला मृत्यू आणि अन्य
दोन रुग्ण गंभीर अवस्थेत
असल्याने संतप्त झालेल्या देवगड, जामसंडे ग्रामस्थांनी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या संदीप कावले यांच्या कुुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक होते.
४यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मृताच्या पत्नीला आरोग्य खात्यामध्ये नोकरी मिळावी, हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरचे तत्काळ निलंबन करण्यात यावे आणि मृताच्या पत्नीला व मुलांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत रुग्णालयातच ठिय्या मांडला.
घटनेची चौकशी करण्यासाठी सोमवारी आरोग्य खात्याचे मुख्य संचालक सतीश पवार हे देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये येणार आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. पितळे व डॉ. उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘वेक्युरोनियम ब्रोमाईड’ व ‘डायक्लो फेनॅक सोडीयम’ या इंजेक्शनमुळे रुग्णांना रिअॅक्शन होऊन मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ती औषधे जिल्ह्यामध्ये सील करण्यात आली आहेत. त्या औषधांची चौकशी केली जाणार आहे.
- डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा, शल्यचिकित्सक