आई मी पोलीस होईन ना, जखमी महिला उमेदवाराची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:16 AM2018-05-10T05:16:55+5:302018-05-10T05:16:55+5:30
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून परिस्थितीशी प्रचंड संघर्ष करीत दीपाली काळे या तरुणीने मुंबई गाठली. पोलीस भरती प्रक्रियेचा एक टप्पा यशस्वी पार करून, ती गावाकडे परतत असतानाच तिचा अपघात झाला. एका भरधाव कारने तिला उडविले.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून परिस्थितीशी प्रचंड संघर्ष करीत दीपाली काळे या तरुणीने मुंबई गाठली. पोलीस भरती प्रक्रियेचा एक टप्पा यशस्वी पार करून, ती गावाकडे परतत असतानाच तिचा अपघात झाला. एका भरधाव कारने तिला उडविले. यात माकडहाडाला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने, ती आता स्वत:च्या पायावर उभीसुद्धा राहू शकत नाही. उपचारानंतर ती बरी होईलसुद्धा. मात्र, बुधवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर होणाऱ्या शारीरिक वेदनांपेक्षा आई आता मी पोलीस होईन ना, या तिच्या प्रश्नाने
सर्वांनाच सुन्न केले.
पुण्याच्या मोराची चिंचोली या छोट्याशा खेड्यात आई आणि दोन बहिणींसह दीपाली राहते. तिसरीला असताना वडील कुटुंबाला सोडून निघून गेले. त्या रागात कुटुंबाने दीपालीच्या आईसह तिच्या मुलींना घराबाहेर काढले. त्यानंतर, दीपालीची आई ही मुलींसह माहेरी आली. दिवसाला अवघ्या दीडशे रुपयांच्या मजुरीवर आईसोबत शेतात कांदा खुरपण्याचे काम करून दीपाली कुटुंबाचा गाडा चालवते.
‘आई मी पीएसआय होणार...
तुला मुंबई फिरवणार,’ असे लहानपणापासून सांगणाºया दीपालीने जिद्दीने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, शिरुळ येथील एका अॅकॅडमीच्या माध्यमातून ती मुंबई पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू लागली. मुंबईला येण्यासाठी गाठीला पैसे असावेत, म्हणून रोजच्यापेक्षा अधिक वेळ कांदा खुरपण्याचे काम
करून तिने कसेबसे पैसे गोळा केले. भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा यशवीरीत्या पार पडल्यानंतर ती आनंदाने घराकडे निघाली होती. ‘आई मी घरी येतेय गं,’ असे सांगून निघत असतानाच, पूर्व द्रुतगती महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत मंगळवारी ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी रात्री उशिरा आई सुरेखा यांना दीपालीच्या अपघाताची माहिती दिली. मुलीला अपघात झाल्याचे ऐकून तिला धक्का बसला.
मुंबईला जायला हातात पैसे नाहीत... काय करावे सुचेना. अशात या मातेने वरच्या समाजातील एका व्यक्तीला ‘काही करा, पण मला मुलीकडे नेऊन सोडा... या बदल्यात मरेपर्यंत तुमच्या घरची चाकरी करेन,’ अशी गळ घातली. त्यानंतर, या व्यक्तीने बुधवारी सकाळी आपल्याला मुंबईत आणून सोडल्याचे सुरेखा काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सायन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारांनंतर शुद्धीवर आलेल्या दीपालीला बुधवारी सकाळी सामान्य कक्षात नेण्यात आले. तेव्हा समोर आईचा चेहरा पाहून तिला अश्रू अनावर झाले. ‘आई, मी आता पोलीस होईन ना?’ असा प्रश्न तिने करताच, आईसह सर्वांचेच काळीज पिळवटून निघाले. या अपघातात दीपालीच्या माकडहाडाला गंभीर
दुखापत झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या पायावर उभे राहणे कठीण झाले आहे. मात्र, तिची जिद्द अजूनही कायम आहे. तिच्या जिद्दीला गरज आहे ती आर्थिक मदतीची.
मुलगी पुन्हा उभी राहील का?
माझी मुलगी आमचा घरचा खरा कर्ता पुरुष आहे. तिला पीएसआय व्हायचे आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तिने मन मारून पै पै जमविली. ओढावलेल्या सर्व प्रसंगाचा सामना करून प्रत्येक वेळी ती जिद्दीने उभी राहिली.
तिला नेमकी काय दुखापत झाली आहे, हेच मला कळेनासे झाले आहे. तिच्यावरील वैद्यकीय उपचारांचा खर्च कसा पेलायचा, हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा असल्याचे तिच्या आई सुरेखा काळे यांनी सांगितले,
तसेच माझी मुलगी पुन्हा उभी राहील ना, असा प्रश्नही त्यांना सतावत आहे.