मुंबई - दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या २२ वर्षांच्या गोविंदाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात या गोविंदावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु कार्डिएक अरेस्टमुळे या गोविंदाचं आज निधन झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या डीन डॉ. संगिता रावत यांनी दिली. प्रथमेश सावंतच्या निधनामुळे करीरोड येथील दहिहंडी पथकावर शोककळा पसरली आहे.
करीरोड येथील समर क्रीडा गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. त्याला मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले. प्रथमेश सावंत हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार घेत होता. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करत होते. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या त्याला पाच लाखांची मदत केली होती.
प्रथमेश करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याची बहीणसुद्धा वारली. या सगळ्या दुःखद घटनांनंतर तो काका-काकीसोबत येथे राहत त्याने त्याचे शालेय शिक्षण सोशल सर्व्हिस लीगच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर बारावीचे शिक्षण एमडी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. रोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटण्याचे काम, दुपारी महाविद्यालय आणि संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम असा त्याचा दिनक्रम असायचा.