मुंबई : मुंबई व जवळपासच्या समुद्र किनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी कासवांच्या उपचाराकरिता ऐरोली येथे कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. आता लवकरच अशी केंद्रे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील सुरू होणार आहेत. कांदळवन कक्षामार्फत कासवांच्या बचाव व पुनर्वसनाकरिता तात्पुरती सुविधा वरील जिल्ह्यांत करण्यात आली आहे.
वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन व अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग समुद्री कासवांसाठी उपचार, संक्रमण केंद्र डहाणू येथे चालवत आहे. या केंद्रामध्ये समुद्र किनारी वाहून आलेल्या जखमी कासवांवर उपचार करून, त्यांचे पुनर्वसन करून शक्य असल्यास त्यांना पुन्हा समुद्रात सोडले जाते. या सर्व उपक्रमांकरिता कांदळवन प्रतिष्ठान आर्थिक साहाय्य या केंद्रात वेळोवेळी करत आहे. कांदळवन कक्षाने मरीन रिस्पॉन्डंट गटाची स्थापना केली असून, त्यात महाराष्ट्र वन विभागातील कर्मचारी, कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांचा समावेश आहे. हा गट विशेषत: समुद्री कासव, सागरी प्राणी समुद्र किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत वाहून आल्यावर वेगवान प्रतिसादासाठी एक शृंखला म्हणून प्रस्थापित करण्यात आला आहे.
--------------------------
कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे भरपाई योजना सुरू केली आहे. त्यानुसार, मासेमारी जाळ्यात अडकलेल्या संरक्षित सागरी प्रजाती जसे कासव, समुद्री सस्तन प्राण्यांना समुद्रात सुखरूप सोडण्यासाठी कमाल २५ हजार रुपये एवढी आर्थिक भरपाई दिली जाते. आजतागायत या योजनेद्वारे ९६ ऑलिव्ह रिडले कासवे, ५२ ग्रीन सागरी कासवे, ३ हॉक्सबिल कासवे आणि एका लेदर बॅक कासवाची सुटका राज्यातील मासेमारांमार्फत करण्यात आली आहे. याकरिता त्यांना एकूण २२ लाख ५० हजार ८५० एवढी भरपाई कांदळवन प्रतिष्ठानमार्फत देण्यात आली आहे.
- वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) आणि कार्यकारी संचालक, मॅनग्रोव्हज फाउंडेशन